भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना
रोहित-विराटवर सारे लक्ष
प्रतिनिधी/ मुंबई
गेल्या जूनमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आणखी एक जागतिक चषक जिंकण्याचा आशावाद बाळगून भारतीय क्रिकेट संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून या स्पर्धेत कशी कामगिरी होते त्यावर भर राहणार असून त्यांना असलेली ही शेवटची संधी मानले जात आहे.
दुबईला रवाना होताना पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा ट्रॅक परिधान करून आलेला रोहित शर्मा त्याच्या गाडीतून खाली उतरून डिपार्चर लाउंजमधील त्याच्या सहकाऱ्यांकडे चालत गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी ‘रोहित भाई’, ‘रोहित सर’ अशा मोठ्या आवाजात त्याला हाका मारण्याचा सपाटा लावला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, उपकर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यासह बहुतेक संघ सदस्य टीम बसमधून पोहोचले. यावेळी स्टार खेळाडूंनी काही चाहत्यांना स्वाक्षरी देऊन किंवा हात हलवून त्यांचे आभार मानले.
जसप्रीत बुमराहशिवाय खेळणारा भारत 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविऊद्ध आपला मोहीम सुरू करेल आणि त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविऊद्ध बहुप्रतिक्षित सामना खेळेल. त्यानंतर मेन इन ब्लू 2 मार्च रोजी न्यूझीलंडचा सामना करून त्यांच्या लीग सामन्यांची सांगता करतील. भारताने इंग्लंडचा घरच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश केल्याने चाहत्यांचा आणि संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई विमानतळावर जमलेले समर्थक रोहित आणि कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये जसा विजय मिळविला तसा आणखी एक विजय मिळवेल अशी आशा बाळगून असतील.
मात्र चाहत्यांचे हे स्वप्न साकार होण्यासाठी भारताला रोहित आणि कोहलीकडून चांगल्या कामगिरीची आवश्यकता भासेल. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये वारंवार अपयश आल्यानंतर मोठ्या टीकेला तोंड दिले आहे. पण त्यांनी त्याच पद्धतीने टीकेला उत्तर दिलेले असून रोहितने कटक वनडेमध्ये इंग्लंडविऊद्ध 90 चेंडूंत 119 धावांची खेळी केली, तर अहमदाबादमध्ये कोहलीने 73 वे अर्धशतक नोंदविले. यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असेल, परंतु या दोघांच्या क्रिकेटमधील भविष्याच्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडणे अत्यावश्यक आहे.
जूनपासून पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा खेळण्यावर आणि 2027 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी संघ तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याने अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे दुबईमध्ये या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष राहील. 14 हजार धावा करणारा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील तिसरा फलंदाज होण्यासाठी कोहलीला 37 धावांची आवश्यकता आहे, तर रोहित 11 हजार धावा पूर्ण करणारा 10 वा फलंदाज होण्यापासून फक्त 12 धावा दूर आहे. परंतु चषक हाती लागला नाही, तर या आकड्यांचे महत्त्व कमी होईल.