भारतीय संघ गटात आघाडीवर
वृत्तसंस्था / कोलंबो
लंकेत सुरू असलेल्या दिव्यांगांच्या चॅम्पियन्स करंडक 2025 च्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने झालेल्या सामन्यात यजमान श्रीलंकेचा 5 गड्यांनी पराभव करत आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेतील सहाव्या दिवशी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान लंकेने 15 षटकात 7 बाद 84 धावा जमविल्या होत्या. लंकेच्या डावामध्ये टी. थिवेंकाने 28 तर सनी उदुगामाने नाबाद 24 धावा जमविल्या. भारतातर्फे अमीर हसनने 14 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. भारतीय संघातील मजिदने नाबाद 32 धावा जमविल्या. भारताने हा विजय 12 षटकात नोंदविला. लंकेतर्फे अक्रम आणि वीराकोडी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारतीय संघाचे नेतृत्व विक्रांत केणी करीत आहेत. भारतीय संघाने आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळविले असून आता या संघाचे लक्ष्य अंतिम फेरीकडे लागून आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 21 जानेवारीला खेळविला जाईल