बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ जाहीर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येत्या फेब्रुवारीत चीनमधील किंगडाव येथे होणाऱ्या बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष व महिला विभागात पदक मिळविण्याच्या हेतूने बलाढ्या संघ उतरणार असून त्यात माजी वर्ल्ड चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके मिळविणाऱ्याल खेळाडूंचा समावेश आहे.
3 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मागील स्पर्धेत महिला विभागात भारताने विजेतेपद मिळविले होते तर पुरुष संघाने यापूर्वी दोन कांस्यपदके मिळविली आहेत, असे बीएआयने सांगितले. मानांकन, कामगिरी व अनुभवाच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली असून महिला संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा पीव्ही सिंधू करणार आहे. पुरुष संघात 2022 मध्ये थॉमस चषक जिंकलेल्या संघातील काही खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्यात लक्ष्य सेन, सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांचा समावेश आहे.
‘गेल्या काही वर्षांपासून आशिया व वर्ल्ड स्तरावरील स्पर्धांत भारताने सातत्यपूर्ण कामगिरी करीत पदके मिळविली आहेत. आगामी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातही फॉर्म व अनुभव असलेल्या खेळाडूंचे योग्य मिश्रण असल्याने दोन्ही विभागात जेतेपदासाठी ते प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे करू शकतात. या प्रसंगी मी त्यांच्या यशासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो,’ असे बीएआयचे सरचिटणीस संयज मिश्रा म्हणाले.
लक्ष्य सेन हा पुरुष विभागात भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू असेल, याच संघात किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी, तरुण मन्नेपल्ली यांचा समावेश आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या सात्विक-चिराग डबल्समध्ये भारताचे आव्हानवीर असतील. त्यांच्यासमवेत साई प्रतीक के व पृथ्वी रॉय, हरिहरन अम्साकरुननही खेळतील. महिला एकेरीत सिंधूला तन्वी शर्मा, उन्नती हुडा, रक्षिता श्री संतोष रामराज, मालविका बनसोड यांचा समावेश आहे तर दुहेरीत त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद, प्रिया के.-श्रुती मिश्रा, तनिषा क्रॅस्टो साथ देतील.
भारतीय बॅडमिंटन संघ : पुरुष-लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, के.श्रीकांत, एचएस प्रणॉय, तरुण मन्नेपल्ली, सात्विकसाईराज, चिराग शेट्टी, पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय, साई प्रतीक, ए. हरिहरन. महिला-पीव्ही सिंधू, उन्नती हुडा, तन्वी शर्मा, रक्षिता श्री संतोष रामराज, मालविका बनसोड, त्रीसा जॉली, गायत्री गोपीचंद, प्रिया के., श्रुती मिश्रा, तनिषा क्रॅस्टो.