For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीकडेच भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा

06:29 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीकडेच भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा
Advertisement

भारतातील अनेक विद्यार्थ्यांचा ओढा विदेशात शिक्षण घेण्याकडे असतो. या विदेशातील शिक्षणात भारतीयांनी जर्मनी या देशाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे एका अहवालामध्ये दिसून आले आहे. अमेरिका आणि इंग्लंड यासारख्या देशांना आता भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी फारसे प्राधान्य देताना दिसत नाहीत, हेच यावरून अधोरेखित होताना दिसते आहे.

Advertisement

यापूर्वी भारतीय विद्यार्थी कॅनडा या देशात शिक्षण घेण्यासाठी अधिक संख्येने जात होते. स्टडी अब्रॉड ट्रेंड्स यांच्या अहवालामध्ये भारतातील विद्यार्थ्यांच्या विदेशातील शिक्षणाबाबतची माहिती देण्यात आली आहे. 2024 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मनी या देशाला शिक्षणासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मनीला पसंती दिली आहे. हे एवढेच कारण नसून कॅनडामध्ये राहण्याच्या खर्चामध्ये सुद्धा अलीकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे नोकरीच्या उपलब्धतेच्या बाबतही घसरण दिसून आल्याने अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाकडे दुर्लक्ष करणे योग्य मानले आहे. त्यामुळे आता कॅनडा हा देश भारतीयांसाठी स्वप्नातील शिक्षणासाठी प्राधान्यामध्ये राहिलेला नाही, असेही अहवालाने नमूद करुन ठेवलेले आहे. युरोपियन देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण 48 टक्के राहिलेले आहे. यानंतर अमेरिकेत 27 टक्के आणि इंग्लंडमध्ये 9.5 टक्के विदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी जात असल्याचे पाहायला मिळते आहे. पूर्वीप्रमाणेच भारतातील विद्यार्थ्यांची विदेशात शिक्षणासाठीची इच्छा तीव्र असून योग्य देशांचा शोध घेण्यासाठी ते नेहमीच तत्पर असताना दिसतात. युरोपियन देशांमध्ये जर्मनीमध्ये शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक 32 टक्के इतके दिसून आले आहे. आयर्लंड, फ्रान्स आणि इतर युरोपियन देशांनी आता विदेशी शिक्षण घेणाऱ्या देशांमध्ये आघाडी घेतली आहे. या देशानंतर मागाहून आता कॅनडा हा देश राहिला आहे. जर्मनीसह युरोप प्रांत आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो आहे. परवडणारी जीवनशैली त्याच अनुषंगाने उच्चप्रतिचे शिक्षण आणि उद्योगांची उत्तुंग कामगिरी लक्षात घेऊन अशा देशांमध्येच शिक्षणासाठी भारतीयांचा कल दिसून येतो आहे. भारतातून विदेशात शिकणाऱ्यांपैकी बरेच जण इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) चे शिक्षण घेण्यासाठी जात असतात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. यानंतर कॉमर्स पदवी किंवा संबंधित पदवी घेण्यासाठी देखील भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने विदेशात जातात. शिक्षणानंतर योग्यतेची नोकरी मिळणंसुद्धा महत्त्वाचं असतं. याचा प्रत्यय अशा देशांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना येतो, असेही अहवालामधून समोर आले आहे. जिथे चांगले उच्च दर्जाचे शिक्षण त्याचप्रमाणे राहणीमानासाठी आवश्यक पोषक वातावरण या पार्श्वभूमीवर योग्य देशाची निवड भारतीय विद्यार्थी करत असतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. त्यासाठी कारणे वेगवेगळी असली तरी त्या देशासाठी अशाप्रकारे संख्या घटणे ही चिंतेची बाब नक्कीच म्हणता येईल.

शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 45 टक्के जणांनी नव्या नोकरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. विदेशातील नोकरीच्या संधी त्याचप्रमाणे या क्षेत्रातील विकासाच्या वेगाकडे पाहून भारतीय विद्यार्थी आकर्षिले जात आहेत. व्यवस्थापन पदवी घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात चांगल्या नोकरीच्या संधी त्याही हँडसम वेतनासह प्राप्त होत आहेत. ही सुद्धा विदेशात शिक्षण घेण्यामागची कारणे सांगता येतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.