किर्गिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत
मायदेशी परतण्याची इच्छा : पाकिस्तान विद्यार्थ्यांना परत आणणार
वृत्तसंस्था/ बिश्केक
किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराने घाबरलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतातून सुमारे 15 हजार विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये शिक्षणासाठी गेले असून ते सध्या भीतीच्या छायेत असल्याचे समजते. भारतीय दुतावासाकडून या विद्यार्थ्यांना काही सूचना करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यास सुऊवात केली आहे. सुरुवातीला 3 विशेष विमानांद्वारे सुमारे 540 विद्यार्थ्यांना परत आणले जाईल, अशी माहिती परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी दिली.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर पडण्यास मनाई केली होती. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन दूतावासाने 0555710041 हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे.
किर्गिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारात काही वैद्यकीय विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. या हिंसेचा पाकिस्तानी विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच 11 हजार पाकिस्तानी विद्यार्थी बिश्केकमध्ये शिकण्यासाठी गेले आहेत, तर सुमारे 6 हजार विद्यार्थी किर्गिस्तानच्या इतर शहरांमध्ये आहेत. हे सर्वजण वेगवेगळ्या संस्थांमधून शिक्षण घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.