ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकू मारून हत्या
लंडन :
ब्रिटनमध्ये 30 वर्षीय भारतीय नागरिक विजय कुमारची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. विजय कुमार हा हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्याचा रहिवासी होता. विजयने 2025 च्या प्रारंभी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सच्या नोकरीचा राजीनामा देत ब्रिटनमध्ये उच्चशिक्षणासाठी अर्ज केला होता. विजय कुमारच्या हत्येच्या घटनेसंबंधी ब्रिटनच्या पोलिसांनी कुठलाच तपशील जारी केलेला नाही. त्याच्या हत्येमागे हरियाणा किंवा पंजाबशी संबंधित इसम सामील असू शकतो असा संशय विजयच्या परिवाराने व्यक्त केला आहे.
विजयचे बंधू रवि कुमार यांनी विदेश मंत्रालयाला पत्र लिहून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तत्काळ मदत करण्याची विनंती केली आहे. या घटनेमुळे आमचा परिवार कोलमडून गेला आहे. ब्रिटनमधील जटिल कायदेशीर अकोपचारिक आणि दस्तऐवजांमुळे आम्ही त्याचा मृतदेह भारतात आणण्यास असमर्थ ठरलो आहोत. याप्रकरणी विदेश मंत्रालयाने मदत करावी असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनाही मदतीचे आवाहन केले आहे.