अमेरिकेत भारतीय विद्यार्थी नील आचार्यचा मृत्यू
पर्ड्यू विद्यापीठाच्या परिसरात मिळाला मृतदेह
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत असलेला एक भारतीय विद्यार्थी मागील आठवड्यात बेपत्ता झाला होता. या विद्यार्थ्याचा मृतदेह आता विद्यापीठ परिसरातील एका इमारतीच्या बाहेर आढळून आला आहे. अमेरिकेत एका काउंटीच्या कोरोनरने याची पुष्टी दिली आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव नील आचार्य होते. कोरोनर पॅरी कॉस्टेलो यांनी नील आचार्यच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
जॉन मार्टिंसन ऑनर्स कॉलेजमध्ये नील हा शिक्षण घेत होता. आचार्यला अखेरचे उबेर ड्रायव्हरने पाहिले होते, या ड्रायव्हरने त्याला पर्ड्यू विद्यापीठात सोडले होते. नील हा 28 जानेवारीपासून बेपत्ता होता अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे. शिकागो येथील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने पर्ड्यू विद्यापीठाच्या संपर्कात असल्याचे आणि मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे म्हटले आहे.