भारतीय शेअरबाजार अल्पशा घसरणीसोबत बंद
सेन्सेक्स 106 अंकांनी घसरला, आयटीक्षेत्र निर्देशांक तेजीत
मुंबई :
सलग दोन सत्रामध्ये तेजीवर स्वार असणारा भारतीय शेअरबाजार मंगळवारी काहीशा घसरणीसोबत बंद होताना दिसला. सेन्सेक्स 106 अंकांनी घसरणीत राहिला होता. एशियन पेंटस्चे समभाग वधारलेले दिसून आले.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 105 अंकांनी कमकुवत होत 80,004 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांनी घसरणीसह 24194 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले तर 14 कंपन्यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. निफ्टी निर्देशांकातील 50 समभागांच्या कामगिरीचा विचार केल्यास 27 समभाग हे घसरणीत आणि 23 तेजीत कार्यरत होते. एनएसईवर ऑटो निर्देशांक 1.28 टक्के इतका घसरणीत राहिला होता. विदेशी गुंतवणुकीदारांनी याचदरम्यान 9947 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. मंगळवारच्या सत्रावर नजर टाकल्यास एशियन पेंटसचे समभाग 1.85 टक्के वाढत 2505 रुपयांवर तर इन्फोसिसचे समभाग 1.83 टक्के वाढत 1924 च्या स्तरावर बंद झाले. जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग 1.9 टक्के, टीसीएसचे समभाग 0.88 टक्के, टेक महिंद्राचे 0.74 टक्के तेजीसह बंद झाले.
हे समभाग घसरणीत
अमेरिकेतील रेटिंग एजन्सी फिच यांनी अदानी यांच्या समभागांबाबत नकारात्मक रेटिंग दिल्याने यांचे समभाग घसरणीसोबत राहिले होते. अदानी पोर्टसचे समभाग 3.26 टक्के घसरत 1129 वर तर अल्ट्राटेकचे समभाग 2.94 टक्के कमकुवत होत 11121 रुपयांवर बंद झाले. यासोबतच सनफार्मा (2टक्के), महिंद्रा आणि महिंद्रा (1.99 टक्के), एनटीपीसी (1.84 टक्के) या कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. मंगळवारच्या सत्रामध्ये एफएमसीजी आणि
आयटी क्षेत्राचे निर्देशांक मजबूत दिसून आले. एफएमसीजी निर्देशांक 0.84 टक्के आणि आयटी निर्देशांक 1.07 टक्के तेजीसह बंद झाला.