टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
मयांक यादव, वरुण चक्रवर्तीचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेश बरोबर होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी शनिवारी भारतीय निवड समितीने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून वेगवान गोलंदाज मयांक यादव आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघातील फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत असून त्याला तब्बल 3 वर्षांनंतर संघात स्थान मिळविण्याची संधी मिळाली. 2021 साली संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश होता. त्याचप्रमाणे या आगामी मालिकेसाठी अष्टपैलू आणि उपयुक्त वेगवान गोलंदाज नितीशकुमार रेड्डीलाही संधी देण्यात आली आहे. भारतीय संघातील हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्यानंतर नितीशकुमार रेड्डी हा अष्टपैलू खेळाडू आहे. रियान पराग, अभिषेक शर्मा, हर्षित राणा यांनी संघातील आपले स्थान कायम राखले आहे. संजू सॅमसन याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली असून जितेश शर्मा राखीव यष्टीरक्षक म्हणून राहिल.
भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबरला ग्वॉल्हेरमध्ये, दुसरा सामना 9 ऑक्टोबरला नवी दिल्ली तर तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळविला जाणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो करत आहे.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिस्नॉयी, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव.