आशिया चषकासाठी भारतीय संघनिवड आज
इंग्लंड दौरा गाजविलेल्या शुभमन गिलला टी-20 संघात कसे बसवायचे हा मोठा पेच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी 15 सदस्यीय संघ निवडण्यासाठी आज मंगळवारी भारताच्या राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार असून यावेळी शुभमन गिलसारख्या प्रतिभावान फलंदाजाला चांगल्या प्रकारे टी-20 संघात कसे बसवायचे, हे सर्वांत मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
इंग्लंडमध्ये नुकतीच स्वप्नवत कामगिरी केलेला हा कसोटी कर्णधार 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत खेळणाऱ्या संघात तसे पाहता स्वाभाविकपणे बसत नाही. अशा परिस्थितीत अजित आगरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी विचारमंथनाचा मुख्य मुद्दा असा असेल की, जे दुऊस्त करण्याची आवश्यकता नाही त्यात सुधारणा कशी करायची. निवड समितीसाठी हे एक भयानक कोडे आहे. परंतु सध्या टी-20 च्या दृष्टीने विचार करता भारतीय क्रिकेट ही प्रतिभेची खाण असून किमान 30 खेळाडू राष्ट्रीय संघात येण्यास सज्ज आहेत आणि एका जागेसाठी तीन ते चार पर्याय उपलब्ध आहेत.
पहिल्या तीन स्थानांसाठी समान पठडीचे सहा क्रिकेटपटू उपलब्ध आहेत. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी गेल्या हंगामात राष्ट्रीय संघातून अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे. पण गिल, यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन (आयपीएल ऑरेंज कॅपधारक) हे तितकेच चांगले आहेत. गोलंदाजीत कुलदीप यादव, वऊण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्यात एका जागेसाठी चुरस लागलेली आहे आणि सर्वांत धूर्त फिरकीपटू असलेल्या युजवेंद्र चहलला बऱ्याच काळापासून दुर्लक्षित केले गेले आहे. परंतु निवड समिती फक्त 15 जणांची निवड करू शकते आणि ज्यांच्याकडे टी-20 संघ निवडण्याचा अधिकार आहे त्यांचा दृष्टिकोन रंजक आहे.
संघ व्यवस्थापनातील एका महत्त्वाच्या सदस्याला वाटते की, एखाद्या स्टार खेळाडूला सामावून घेण्यासाठी गेल्या हंगामात संघात नियमितपणे झळकलेल्या कोणत्याही खेळाडूला वंचित ठेवणे हे अन्यायकारक ठरेल. दुसरा विचार असा आहे की, भारतीय क्रिकेटसाठी सर्व स्वरुपांत एक कर्णधार उपयुक्त ठरतो. याबाबतीत गिल हा संबंधित घटकांसाठी एक स्पष्ट पर्याय आहे. परंतु हे सहजपणे घडेल अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही. कारण सूर्यकुमार यादवच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघाचे चांगली कामगिरी करण्याचे प्रमाण 85 टक्के असून गेल्या 20 पैकी 17 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. यापैकी कोणत्याही सामन्यात गिल आणि जैस्वाल नव्हते.
पण गिल आणि जैस्वाल हे गेल्या एका वर्षात कसोटी सामन्यांमध्ये व्यस्त होण्यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत होते आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती. यात प्रभावी ‘आयपीएल’चाही समावेश होतो. कसोटी सामन्यांमुळे टी-20 सोडावे लागण्यापूर्वी गिल सूर्याचा उपकर्णधार होता. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल नंतर सूर्याचा उपकर्णधार बनला. त्याला दीर्घकालीन नेतृत्वाचा उमेदवार मानले जात नसले, तरी त्याने चांगली कामगिरी केली आहे. तथापि, जर गिलने सूर्याचा उपकर्णधार म्हणून जागा घेतली, तर अक्षरला नक्कीच त्याची खंत भेडसावेल.
मंगळवारी निवड समितीने गिलला 15 खेळाडूंमध्ये निवडले, तर त्यांना त्याला अंतिम संघात खेळवावे लागेल. म्हणजे संजू, अभिषेक किंवा तिलक यांच्यापैकी एकाला त्यांच्या फलंदाजीच्या जागेशी तडजोड करावी लागेल. 15 जणांच्या संघात शुभमनचा समावेश करणे म्हणजे रिंकू सिंगला वगळणे असे देखील होऊन शकते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या काळात कोलकाता नाईट रायडर्सतर्फे किंवा भारतातर्फे या मोठ्या हिटरने फारशी काही कामगिरी केलेली नाही. गंभीरच्या दृष्टीने ‘फिनिशर’च्या भूमिकेसाठी निश्चित नियुक्ती असे काहीही नसते. त्यामुळे निवड करणे सोपे होणार नाही.
हार्दिक पंड्या हा एक उत्तम वेगवान गोलंदाज असल्याने आणि जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे लाइन-अपमध्ये स्वाभाविक पर्याय असल्याने राखीव वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी तीन पर्याय आहेत. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज हे दोघेही कसोटीतील तज्ञ गोलंदाज मानले जात असल्याने हर्षित राणाचे पारडे भारी वाटते. 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविऊद्धची मायदेशातील मालिका सुरू होणार असून मिळालेल्या माहितीनुसार, तुलनेने कमकुवत पाहुण्या संघाविऊद्ध बुमराहची आवश्यकता भासणार नाही. कारण प्रसिद्ध व सिराज हे ताजेतवाने आणि पुढे जाण्यास उत्सुक असतील.
फिरकी गोलंदाजांच्या बाबतीत अक्षर पटेल, वऊण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे पहिले तीन पर्याय आहेत आणि गंभीरची अष्टपैलू खेळाडूंबद्दलची ओढ वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देऊन जाण्याची शक्यता आहे. दुबई आणि अबुधाबीमधील खेळपट्ट्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी जितक्या जीर्ण आणि संथ होत्या तितक्या यावेळी असणार नाहीत. पण फिरकी गोलंदाजांना वाजवी मदत मिळेल. फिनिशर आणि यष्टीरक्षक-फलंदाज यांचा विचार करता नितीशकुमार रे•ाr आणि रिषभ पंत हे त्यांच्या दुखापतींमधून अद्याप बरे झालेले नाहीत. परिणामी पंड्यानंतर शिवम दुबे हा मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या अष्टपैलूच्या भूमिकेत असेल. दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या जागेसाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यात लढत आहे. जितेशने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरसाठी आयपीएल जिंकणाऱ्या मोहिमेत फिनिशर म्हणून काही चांगल्या खेळी केल्या होत्या आणि खालच्या फळीतील भूमिकेसाठी तो अधिक योग्य आहे.