चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
अनफिट बुमराहच्या जागी राणाची, जैस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीची निवड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह अनफिट ठरल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही तर यशस्वी जैस्वालही या स्पर्धेत खेळणार नसून त्याच्या जागी स्पिनर वरुण चक्रवर्तीला स्थान मिळाले आहे.
बुमराहला पाठदुखीचा त्रास होत असल्याने तो या स्पर्धेत सहभागी होणार का, याबाबत चर्चा सुरू होती. पण बीसीसीआयने तो अनफिट असल्याचे सांगून या चर्चेला विराम दिला आहे. राष्ट्रीय निवड समितीने चॅम्पियन्स ट्राफीसाठी बुमराहच्या जागी हर्षित राणाची संघात वर्णी लागली आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये सुरू होत आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार असून भारताची सलामीची लढत बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी होईल.
निवड समितीने फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीलाही संघात स्थान दिले असून त्याला फलंदाज यशस्वी जैस्वालच्या जागी घेण्यात आले आहे. प्राथमिक संघात जैस्वालला स्थान देण्यात आले होते. वरुण या संघातील पाचवा स्पिनर आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत शानदार प्रदर्शन केल्यानंतर त्याला वनडे मालिकेतही स्थान देण्यात आले. पण त्याच्यामुळे जैस्वालवर संघाबाहेर राहण्याची वेळ आली आहे. रोहित व गिल सलामीस येत असल्याने त्याला अंतिम संघात स्थान मिळणेही कठीण झाले असते. तो आता शिवम दुबे, मोहम्मद सिराज यांच्यासह राखीव खेळाडूंत असेल.
2022 मध्ये बुमराहने पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील सिडनी कसोटीत पाठीदुखीचीच समस्या निर्माण झाल्याने पहिल्या डावात त्याने 10 षटके गोलंदाजी केल्यानंतर माघार घेतली होती. एनसीएमध्ये त्याच्या दुखापत पुनर्वसन प्रक्रेयेनंतर एनसीएचे प्रमुख नितिन पटेल यांनी सांगितले की बुमराहने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली असून त्याचे स्कॅनही ठीक असल्याचे दिसते. पण स्पर्धा सुरू होईपर्यंत तो गोलंदाजी करू शकेल का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे निवड समितीने त्याच्याबाबत धोका पत्करण्याचे टाळले आहे,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने स्पष्ट केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.