कुवैतमध्ये भारतीय प्रवाशांना सहन करावा लागला त्रास
आपत्कालीन लँडिंगमुळे तेथे पोहोचले : गल्फ एअरवर भेदभावाचा आरोप
वृत्तसंस्था/ कुवैत सिटी
60 भारतीय प्रवासी रविवारी 24 तासांपर्यंत अधिक वेळेपर्यंत कुवैतच्या विमानतळावर अडकून पडले. हे सर्व भारतीय मुंबईहून इंग्लंडच्या मँचेस्टर येथे जात होते. 60 तासांपर्यंत भोजन, पाणी आणि आवासाशिवाय ठेवण्यात आल्याचा आरोप या प्रवाशांनी गल्फ एअरवर केला आहे.
घटनेदरम्यान केवळ ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि अमेरिकेच्या प्रवाशांनाच राहण्याची आणि जेवणाची सुविधा देण्यात आली. तर भारतीय, पाकिस्तान आणि दक्षिण पूर्व आशियाई देशाच्या लोकांना कुठलीच सुविधा देण्यात आली नसल्याचा आरोप भारतीय प्रवाशांनी गल्फ एअरवर केला आहे.
गल्फ एअरच्या फ्लाइटच्या इंजिनमध्ये रविवारी अचानक बिघाड झाला होता, ज्यानंतर विमान कुवैत विमानतळावर उतरविण्यात आले होते. विमानाच्या इंजिनमधील बिघाड दूर करण्यास 24 तासांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. भारतीय प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:ला झालेला त्रास कथन केला आहे. ट्रान्झिट व्हिसा नसल्याने विमानतळाबाहेरही पडता येत नव्हते असे या लोकांनी नमूद केले आहे.
कुवैतमध्ये सुरू असेल्या जीसीसी परिषदेमुळे विमानतळावरील हॉटेल रिकामी नव्हते, यामुळे भारतीय प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. तर ब्रिटिश आणि अमेरिकेचा पासपोर्ट बाळगणाऱ्या प्रवाशांकडे ट्रान्झिट व्हिसा होता, याचमुळे त्यांना बाहेर जाण्याची अनुमती होती असे स्पष्टीकरण भारतीय दूतावासाकडुन देण्यात आले आहे. ट्रान्झिट व्हिसा कमी कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे. यात 2-3 दिवसांपर्यंत कुठल्याही देशात राहण्याची अनुमती मिळते. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना लॉन्जमध्ये जेवण पुरविले आहे.