कॅनडात भारतीय वंशाचे उद्योजक दर्शन सिंह यांची हत्या
लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडात भारतीय वंशाच्या दिग्गज उद्योजकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. उद्याजक दर्शन सिंह साहसी यांची कॅनडाच्या एबट्सफोर्ड भागात हत्या करण्यात आली आहे. कारमधून जात असताना त्यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
दर्शन सिंह साहसी यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून यात दर्शन सिंह कारमध्ये बसत असताना एक हल्लेखोर त्यांच्याकडे येतो आणि गोळीबार करत असल्याचे दिसून येते. हल्लेखोर गोळीबारानंतर टोयोटा कोरोला कारमधून फरार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी दर्शन सिंह यांना रुग्णालयात हलविले होते, जेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा तपास सध्या प्रारंभिक टप्प्यात असून लवकरच याविषयी विस्तृत माहिती दिली जाणार असल्याचे कॅनडा पोलिसांनी सांगितले आहे.
कॅनडातील गँगस्टर गोल्डी ढिल्लनने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डी हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. दर्शन सिंह साहसी हा अमली पदार्थांच्या तस्करीत सामील होता आणि खंडणीच्या मागणीकडे त्याने दुर्लक्ष केले होते असा दावा ढिल्लनने स्वत:च्या पोस्टमध्ये केला आहे.