कतारमधील नौसैनिकांशी भारतीय अधिकाऱ्यांची चर्चा
पुढील न्यायालयीन प्रक्रियेसंबंधी विचारविमर्ष
वृत्तसंस्था /कतार
कतारमध्ये 8 माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावल्याप्रकरणी भारत सरकार संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. नजिकच्या काळातील न्यायालयीन प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आमचे राजदूत आठही जणांना भेटले आहेत. तसेच, याप्रकरणी न्यायालयात आतापर्यंत दोन सुनावणी झाल्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने गुऊवारी सांगितले. कतारमधील न्यायालयाने अलीकडेच आठ भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. कतारमधील आठ माजी नौसैनिकांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी आमच्या अपीलवर दोन सुनावण्या झाल्या आहेत. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि सर्व कायदेशीर मदत करत आहोत. आमच्या राजदूताला रविवारी (3 डिसेंबर) तुऊंगात असलेल्या आठ लोकांना भेटण्यासाठी कॉन्सुलर अॅक्सेस मिळाला. ही संवेदनशील बाब आहे, पण आम्ही त्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी सुरू ठेवणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात दुबई येथे झालेल्या सीओपी-28 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मोदी आणि बिन हमाद अल-थानी यांच्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत चर्चा झाल्याचेही बागची यांनी स्पष्ट केले.