तालिबानच्या संरक्षण मंत्र्यासोबत भारतीय अधिकाऱ्याची चर्चा
अफगाणिस्तानसोबत भारताची मैत्री : पाकिस्तानचे वाढले टेन्शन
वृत्तसंस्था/काबूल
अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध बळकट होत आहेत. भारताच्या विदेश मंत्रालयातील संयुक्त सचिव जे.पी. सिंह हे काबूलच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारतीय राजनयिकाने तालिबानचे संरक्षणमंत्री मुल्ला याकूब मुजाहिदची भेट घेतली आहे. मुल्ला याकूब हा तालिबानचा सर्वोच्च नेता राहिलेला दहशतवादी मुल्ला उमरचा पुत्र आहे. मुल्ला उमर 1996-2001 पर्यंत अफगाणिस्तानचे नेतृत्व करत होता. भारतीय प्रतिनिधीने तालिबानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्ताकी आणि माजी अध्यक्ष हामिद करझाई यांचीही भेट घेतली आहे. भारतीय राजनयिकाचा हा चालू वर्षातील दुसरा काबूल दौरा आहे.
2021 मध्ये तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविले होते. तेव्हापासून भारताने तालिबान राजवटीसोबत संपर्क राखला आहे. भारतीय प्रतिनिधीशी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच यात विशेषकरून मानवी सहकार्य आणि अन्य मुद्दे सामील आहेत. अफगाणिस्तान आणि भारतादरम्यान संवाद वाढविण्यात रुची दाखविण्यात आल्याचे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. करझाई यांनीही ट्विट करत जे.पी. सिंह यांच्यासोबत दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांवर चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
तालिबानची भारतासमोर मागणी
करझाई यांनी भारताच्या सहकार्याचे कौतुक केले आहे. तसेच शिक्षण आणि युवांना प्रशिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात यावा अशी सूचना केली आहे. तर तालिबानच्या राजवटीने पुन्हा एकदा स्वत:च्या भूमीचा वार भारताच्या विरोधात होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.तालिबानने स्वत:च्या राजदूताच्या नियुक्तीला भारताने मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.
भारताकडून वाढीव मदत
भारत अफगाणिस्तानसाठीची मानवी मदत वाढविण्यास तयार आहे. तसेच पुनउ&भारणीच्या प्रयत्नांनाही वेग देण्याची इच्छा बाळगून आहे. हे सर्व मदतकार्य तालिबानच्या राजवटीला मान्यता न देताच केले जाणार आहे. याकूबने भारतासोबत संरक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.