भारतीय पुरुषांची सुवर्णाच्या दिशेने आगेकूच,
इराणवर दणदणीत विजय, महिला संघाला मात्र पोलंडकडून पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
भारतीय पुऊष संघाने इराणवर 3.5-0.5 असा आणखी एक दणदणीत विजय मिळवत खुल्या विभागातील सुवर्णपदकावरील आपला दावा मजबूत केला आहे, परंतु महिलांना पोलंडकडून 1.5-2.5 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची आठवी फेरी येथे सध्या सुरू आहे. आठ सामन्यांतील आठव्या विजयासह भारतीय पुऊषांनी त्यांची गुणसंख्या 16 वर नेली आहे आणि या सर्वांत मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेत फक्त तीन फेऱ्या बाकी असताना जवळचे प्रतिस्पर्धी हंगेरी आणि उझबेकिस्तानवर तब्बल दोन गुणांची आघाडी घेतली आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला अर्जुन एरिगेसी काळ्या सोंगट्यासह खेळताना बर्दिया दानेश्वरच्या बचावावर तुटून पडला. बर्दिया भारतीय खेळाडूसाठी जराही तोड ठरू शकला नाही. जागतिक किताबासाठीचा आव्हानवीर डी. गुकेशने नंतर काळ्या सोंगट्यासह खेळताना परहम मगसुदलूला नामोहरम केले. आर. प्रज्ञानंदने भारतीय विजय निश्चित करताना अमीन तबतबाईसोबतचा सामना बरोबरीत सोडविला, तर विदित गुजराथीने खेळाच्या सर्व विभागांमध्ये इदानी पौयाला मागे टाकून संघाला आणखी एक मोठा विजय मिळवून दिला.
अर्जुनसाठी 2800 रेटिंगच्या दिशेने हे आणखी एक पाऊल ठरले. कारण त्याने आठ सामन्यांतून आपली वैयक्तिक संख्या उल्लेखनीय 7.5 गुणांवर नेली आहे. लाईव्ह रेटिंगमध्ये अर्जुन आता 2793 गुणांवर आहे आणि जर त्याने 2800 चा टप्पा ओलांडला, तर तो इतिहासातील असे करणारा 16 वा खेळाडू आणि विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय ठरेल. गुकेशलाही या विजयाने 2785 रेटिंग पॉइंट्सवर नेले आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये दोन भारतीयांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महिला विभागात ग्रँडमास्टर डी. हरिकाचा फॉर्म गडबडणे कायम राहून अलिना काश्लिंस्कायाकडून तिला पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेतील हरिकाचा हा तिसरा पराभव आहे. पोलंडच्या मोनिका सोकोने दुसऱ्या पटावर आर. वैशालीचा पराभव केला. वैशालीने या लढतीत केलेल्या काही चुका तिल्या भोवल्या, तर दिव्या देशमुखने तिसऱ्या पटावर खूप संघर्षानंतर अलेक्सांद्र माल्टसेव्हस्कायाला नमविले.
या पार्श्वभूमीवर वंतिका अग्रवालवर बरोबरी साधून देण्याची जबाबदारी होती आणि तिच्या हातात पूर्ण विजयी स्थिती आहे असे दिसत होते. तथापि, वंतिकाने वेळेच्या दबावाखाली एक चूक केली आणि शेवटी अॅलिस्जा स्लिविकासोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारतीय महिला संघासोबत पोलंड आणि कझाकस्तान गुणतालिकेत प्रत्येकी 14 गुणांसह आघाडीवर आहेत, तर अमेरिका, आर्मेनिया आणि युक्रेन एका गुणाने मागे आहेत. पुढील फेरीत भारतीय पुऊषांचा सामना उझबेकिस्तानशी, तर महिलांचा सामना अमेरिकेशी होणार आहे.