भारतीय पुरूष हॉकी संघाकडे आशिया चषक
राजगीर (बिहार)
हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष हॉकी संघाने रविवारी येथे झालेल्या हिरो पुरस्कृत 2025 च्या आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकल्याने भारतीय हॉकी संघाने आता 2026 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला आहे.
रविवारी येथील राजगीर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात भारताने कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करत आशिया खंडात आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. या सामन्यात सुखजित सिंगने 30 व्या सेकंदालाच भारताचे खाते उघडले. त्यानंतर दिलप्रितसिंगने 28 व्या आणि 45 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. अमित रोहितदासने 50 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. या लढतीतील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत पेनल्टी कॉर्नरवर कोरियाचा एकमेव गोल नोंदविला गेला. ही स्पर्धा जिंकल्याने आता भारतीय पुरूष हॉकी संघ 2026 मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट प्रवेश केला आहे.
भारतीय पुरूष हॉकी संघाचा गेल्या 8 वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. याआधी भारताने 2017 साली ढाका येथे झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रूपयांचे तर प्रशिक्षक आणि सहाय्यक वर्गातील प्रत्येक सदस्याला दीड लाख रूपयांचे बक्षिस हॉकी इंडियाने जाहीर केले आहे.
कर्णधार हरमनप्रित सिंगने सुरूवातीपासूनच कोरियाच्या बचावफळीवर चांगले दडपण टाकण्यात यश मिळविले होते. सामन्यातील 30 सेकंद झाले असताना सुखजित सिंगने कोरियाच्या बचावफळीतील खेळाडूंना हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. 28 व्या मिनिटाला दिलप्रित सिंगने भारताचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने कोरियावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर 45 व्या मिनिटाला दिलप्रित सिंगने संघाचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल नेंदविला. 50 व्या मिनिटाला अमित रोहिदासने संघाचा चौथा गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. 51 व्या मिनिटाला डेन सनने कोरियाचा एकमेव गोल केला. राजगीरमध्ये हा सामना पाहण्यासाठी हॉकी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमविता विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत भारताने 5 सामने जिंकले असून 1 सामना बरोबरीत राखला. भारतीय संघाने प्राथमिक फेरीतील 3 सामने जिंकले तर त्यानंतर सुपर-4 फेरीत भारताने मलेशियाचा तसेच चीनचा अनुक्रमे 4-1 व 7-0 असा पराभव केला. दक्षिण कोरियाबरोबरचा सामना भारताने 2-2 असा बरोबरीत राखला. भारतीय संघाने चौथ्यांदा आशिया चषक पटकाविला असून याआधी त्यांनी 2003, 2007 आणि 2017 साली जेतेपद मिळविले होते. तर कोरियाने ही स्पर्धा 1994, 1999, 2009, 2013 आणि 2022 अशी पाचवेळा जिंकली होती.