भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलग सातवा पराभव
वृत्तसंस्था/ अँटवेर्प (बेल्जियम)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्प्यात भारतीय पुरुष हॉकी संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली असून त्यांना सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. येथे झालेल्या सामन्यात यजमान बेल्जियमने भारताचा 6-3 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
हॉकी फेडरेशनच्या मानांकनात तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने आपले खाते पहिल्याच मिनिटाला उघडले. बेल्जियमला पहिल्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर वर आर्थर व्हॅन डोरेनने अचूक गोल केला. 28 व्या मिनिटाला अॅलेक्सझांडेर हेन्ड्रीकने पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत बेल्जियमने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळवली होती.
या सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या 15 मिनिटांच्या खेळाच्या सत्रात बेल्जियमच्या आक्रमक चढायांमुळे भारताची बचावफळी पूर्णपणे खिळखिळी झाली. 36 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने भारताचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडले. 38 व्या मिनिटाला मनदीप सिंगने मैदानी गोल करुन बेल्जियमशी बरोबरी साधली. 49 व्या मिनिटाला रोमन डूव्हेकोटने, 53 व्या मिनिटाला टी. स्टॉकब्रोकने आणि 54 व्या मिनिटाला व्हॅन डोरेनने मैदानी गोल करत बेल्जियमला 5-2 अशी आघाडी मिळवून दिली. 56 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अमित रोहिदासने आपल्या संघाचा तिसरा गोल केला. टॉम बूनने 59 व्या मिनिटाला बेल्जियमचा सहावा आणि शेवटचा गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात भारताला 9 तर बेल्जियमला 6 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील युरोपच्या टप्प्यात भारतीय संघाचा हा सलग सातवा पराभव राहिल्याने पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला नेदरलँड्सने पहिल्या सामन्यात 2-1, दुसऱ्या सामन्यात 3-2 असे पराभूत केले. त्यानंतर अर्जेंटिनाने पहिल्या सामन्यात भारतावर 3-2 तर दुसऱ्या सामन्यात 2-1 अशी मात केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 3-2 तर दुसऱ्या सामन्यातही 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला आहे. प्रो-लीग हॉकी स्पर्धेत एकूण 9 संघांचा समावेश असून गुणतक्त्यात भारतीय संघ 15 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेत 5 सामने जिंकले असून 10 सामने गमाविले आहेत. आता भारतीय पुरुष हॉकी संघाचा शेवटचा सामना रविवारी उशिरा येथे बेल्जियमबरोबर खेळविला जाणार आहे.