ट्रम्प यांच्या विजयाने भारतीय बाजाराची उसळी
सेन्सेक्स 901 अंकांनी मजबूत : आयटीमध्ये चमक
मुंबई :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने भारतीय शेअर बाजारामध्ये शानदार तेजी पाहायला मिळाली. आयटी आणि फार्मा समभागांमध्ये जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनाही चालना मिळाली. एकूणच, बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार एक टक्क्यांहून अधिक वाढल्याचे दिसून आले.
दरम्यान, बीएसई सेन्सेक्स 901.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 1.13 टक्क्यांसोबत 80,378.13 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात निर्देशांक 1,093.1 अंकांनी किंवा 1.37 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 270.75 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 24,484.05 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स समभागांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लक्षणीय वाढले. दुसरीकडे, टायटन, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरले.
बाजारातील वाढीचे कारण
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, ‘अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जागतिक बाजारपेठेत मोठी तेजी दिसून आली. ट्रम्प यांच्या मजबूत जनादेशामुळे राजकीय अनिश्चितता कमी झाली आहे. यामुळे कर कपात आणि सरकारी खर्चात वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे.’
ते म्हणाले की अमेरिकेत आयटी खर्च वाढण्याच्या अपेक्षेमुळे देशांतर्गत आयटी कंपन्यांच्या समभागात वाढ झाली आहे. नायर म्हणाले,‘आयटी कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, अमेरिकेतील बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील खर्च वाढला आहे. भारतीय कंपन्यांसाठी हे सकारात्मक आहे.’
जागतिक बाजाराच्या ट्रेंडवर एक नजर
आशियातील इतरत्र, जपानचा निक्की वधारत राहिला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग घसरणीसह बंद झाला.