For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय शेर आफ्रिकन भूमीत ढेर!

06:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारतीय शेर आफ्रिकन भूमीत ढेर
Advertisement

बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा डावाने पराभव : विराटची एकाकी झुंज, सामनावीर डीन एल्गारची 185 धावांची खेळी : नांद्रे बर्गरचे सामन्यात 7 बळी

Advertisement

वृत्तसंस्था /सेंच्युरियन

येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेने भारतावर एक डाव व 32 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर संपल्यानंतर त्यांना 163 धावांची भक्कम आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात खेळताना मात्र आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव 34.1 षटकांत 131 धावांवर आटोपला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरी व शेवटची कसोटी दि. 3 जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळवण्यात येईल.

Advertisement

दक्षिण आफ्रिकने तिसऱ्या दिवसाचा खेळ 5 बाद 256 धावांपासून पुढे सुरु केला. खेळपट्टीवर तिसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी डीन एल्गार (140) आणि मार्को जॅनसेन (3) आले. एल्गारने दुसऱ्या दिवसाप्रमाणेच तिसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. पण गरजेच्या वेळी विकेट मिळवून देणारा शार्दुल ठाकूर यावेळीही आपले काम करून गेला. डावातील 95 व्या षटकात शार्दुलने टाकलेल्या बाऊन्सरवर एल्गार यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेलबाद झाला. त्याने 287 चेंडूत 28 चौकारासह 185 धावांची खेळी केली. मार्को जॅनसेननेही 147 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 84 धावांची सुरेख खेळी केली. एल्गार व जॅनसेन यांनी सहाव्या गड्यासाठी 111 धावांची भागीदारी साकारली. एल्गार बाद झाल्यानंतर जॅनसेन शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. त्याला इतर तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. गेराल्ड कोएत्झी (19), कागिसो रबाडा (1), आणि नांद्रे बर्गर (0) या तळातील फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. यामुळे आफ्रिकेचा पहिला डाव 108.4 षटकांत 408 धावांवर संपुष्टात आला व यजमान संघाला 163 धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनेही 2 तर शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

भारतीय फलंदाजांचे सपशेल लोटांगण

पहिल्या डावात 163 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. दुसऱ्या डावात भारतीय संघ सुरुवातीपासून झगडताना दिसला. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यशस्वी जैस्वालही 5 धावा काढून परतला. भारतीय फलंदाज एक एक करून पॅव्हेलियनमध्ये परतत होते. एकूणच, भारतीय पिचेसवरील शेर दुसऱ्या डावात केवळ 34.1 षटकेच खेळू शकले आणि 131 धावांत गारद झाले. दुसऱ्या डावात फक्त विराट कोहलीच चमकदार कामगिरी करू शकला. कोहलीने 82 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 76 धावा केल्या. शुभमन गिलने 6 चौकारासह 26 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पहिल्या डावात शतक करणारा केएल राहुल दुसऱ्या डावात मात्र 4 धावांवर बाद झाला. रविचंद्रन अश्विननेही गोल्डन डकवर (0) विकेट गमावली. शार्दुल ठाकूर 2, जसप्रीत बुमराह 0 आणि मोहम्मद सिराज 4 धावा करून तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने 4 आणि मार्को जॅनसेनने 3 बळी घेतले. याशिवाय, रबाडानेही दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

कागदी वाघ सेंच्युरियनवर सपशेल ढेपाळले

रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 31 वर्षानंतर इतिहास रचण्यासाठी आफ्रिकेत दाखल झाला खरा पण कागदावरच्या भारतीय वाघांनी सेंच्युरियनच्या मैदानावर सपशेल नांगी टाकली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाल्याने मालिकाविजयाचे भारताचे स्वप्न भंगले आहे. आता, केपटाऊन येथे होणारी कसोटी जिंकत टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्याची संधी असेल.

संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव 245 व दुसरा डाव 34.1 षटकांत सर्वबाद 131 (शुभमन गिल 26, विराट कोहली 76, बर्गर 33 धावांत 4 बळी, जॅनसेन 36 धावांत 3 बळी, रबाडा दोन बळी). दक्षिण आफ्रिका पहिला डाव 108.4 षटकांत सर्वबाद 408 (डीन एल्गार 185, झोर्झी 28, बेडिंगहॅम 56, मार्को जॅनसेन नाबाद 84, कोएत्झी 19, बुमराह 69 धावांत 4 बळी, मोहम्मद सिराज 91 धावांत 2 बळी, अश्विन, शार्दुल, प्रसिद्ध प्रत्येकी एक बळी).

विराटचा आणखी एक माईलस्टोन

द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात खेळताना विराट कोहलीने गुरुवारी 61 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ही खेळी करत असताना विराटने 2023 वर्षातील आपल्या 2000 आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. या धावासह त्याने कारकिर्दीतील आणखी एक माईलस्टोन पार केला. एका वर्षात दोन हजार धावा करण्याची ही त्याची सातवी वेळ ठरली. ही कामगिरी करताना त्याने लंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकले. संगकाराने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तब्बल सहावेळा एका वर्षात दोन हजार धावा केल्या होत्या. विराटने 2012, 2014, 2016, 2017, 2018, 2019 आणि त्यानंतर 2023 मध्ये ही कामगिरी केली. 2020, 2021 आणि 2022 मध्ये त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात दोन हजार धावा करणारे खेळाडू

  • विराट कोहली - सात वेळा
  • कुमार संगकारा - सहा वेळा
  • सचिन तेंडुलकर - पाच वेळा
  • माहेला जयवर्धने - पाच वेळा
  • जॅक कॅलिस - चार वेळा

डीन एल्गारची 185 धावांची खेळी ठरली खास

आपली शेवटची कसोटी मालिका खेळत असलेल्या डीन एल्गारने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत 185 धावांची धमाकेदार खेळी साकारली. भलेही त्याचे द्विशतक हुकले असले तरी त्याने ही मालिका कायम लक्षात राहील, अशीच खेळी बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात केली. एल्गारने 287 चेंडूत 185 धावांपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेसाठी भारताविरुद्ध एखाद्या खेळाडूने केलेली ही पाचवी सर्वात मोठी खेळी ठरली. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हाशिम आमलाने भारताविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेसाठी सर्वात मोठी नाबाद 253 धावांची खेळी केली होती. यानंतर 185 धावांची खेळीसह डीन एल्गार  दिग्गजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताविरुद्ध आफ्रिकेसाठी सर्वोत्तम खेळी करणारे खेळाडू

  • नाबाद 253            हाशिम आमला (6 फेब्रुवारी 2010, नागपूर)
  • नाबाद 217            एबी डिविलियर्स (3 एप्रिल 2008, अहमदाबाद)
  • नाबाद 201            जॅक कॅलिस (16 डिसेंबर 2010, सेंच्युरियन)
  • 196         हर्शल गिब्स (16 नोव्हेंबर 2001, पोर्ट एलिझाबेथ)
  • 185         डीन एल्गार (28 डिसेंबर 2023, सेंच्युरियन)
Advertisement
Tags :

.