For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय हॉकी संघाचे मालिकेतील आव्हान राखण्यासाठी प्रयत्न

06:12 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय हॉकी संघाचे मालिकेतील आव्हान राखण्यासाठी प्रयत्न
Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

Advertisement

यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत हॉकी संघामध्ये सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱ्या विजयापासून रोखण्यासाठी तसेच मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्याकरिता कर्णधार हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.

या मालिकेतील पहिले सलग दोन सामने ऑस्ट्रेलियाने एकतर्फी जिंकून आता ते मालिका हस्तगत करण्याच्या मार्गावर आहेत. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय हॉकी संघाची ही मालिका सत्वपरीक्षा ठरत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 अशा गोल फरकाने तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी भारताचा 4-2 असा फडशा पाडला आहे. बुधवारी या मालिकेतील होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक फुल्टॉन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकीपटूंचा पेनल्टी कॉर्नरवर अधिक सराव करवून घेतला जात आहे. कुकुंबुरास चेंडूचा वापर या मालिकेत होत असल्याने भारतीय संघावर अधिक दडपण येत असल्याचे जाणवते. गोलरक्षण आणि बचावफळीतील त्रुटी सुधारणे जरुरीचे आहे. भारतीय संघातील मनदीप सिंग, ललीतकुमार उपाध्याय, गुरुजंत सिंग, सुखजीत सिंग यांना मिळालेल्या संधी वाया दवडून चालणार नाहीत. ऑस्ट्रेलियाची आघाडी व बचावफळी भक्कम असल्याने भारताला या मालिकेतील उर्वरित सामन्यात आपल्या डावपेचात बदल करावा लागेल. मध्यफळीची जबाबदारी प्रामुख्याने उपकर्णधार हार्दीक सिंगवर राहील. कर्णधार हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय आणि अमित रोहीदास यांना इतर खेळाडूबरोबर योग्य समन्वय राखावा लागेल. या मालिकेतील चौथा सामना 12 एप्रिलला तर पाचवा सामना 13 एप्रिलला खेळविला जाईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.