भारतीय हॉकी संघ विजयी
वृत्तसंस्था / स्टिलेनबॉश (द.आफ्रिका)
द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात द.आफ्रिकेचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. भारतीय हॉकी संघाने द. आफ्रिकेच्या दौऱ्याचा शेवट विजयाने केला. या दौऱ्यामध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने एकही सामना गममवला नाही.
या दौऱ्यामध्ये उभय संघामध्ये दोन हॉकी कसोटी आणि एक मित्रत्वाचा सामना आयोजित केला होता. या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यामध्ये भारतातर्फे शिलानंद लाक्रा, आदित्य अर्जुन आणि अमित रोहीदास यांनी गोल केले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या हॉकी कसोटीत भारताने द. आफ्रिकेला 2-2 असे बरोबरीत रोखले. भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित सिंगने दोन गोल केले. तर शेवटच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेवर 4-1 अशी मात केली. या सामन्यात भारतातर्फे सुखजित सिंग, अमित रोहीदास, हार्दिक सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला.