जर्मनीकडून भारतीय हॉकी संघ पराभूत
वृत्तसंस्था/ बर्लिन (जर्मनी)
येथे सुरु असलेल्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाची मोहिम पराभवाने सुरु झाली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान जर्मनी कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने भारताचा 7-1 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या सामन्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर्मनीच्या खेळाडूंनी भारतावर चांगलेच दडपण राखले होते. सामन्याच्या 4 थ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जर्मनीचे खाते निको किस्टेनने उघडले. त्यानंतर 5 व्या मिनिटाला अॅलेक व्हॉन स्किव्हेरिनने मैदानी गोल करुन जर्मनीची आघाडी वाढवली. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत जर्मनीने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. 25 व्या मिनिटाला हेसबॅच बेनने मैदानी गोल करुन जर्मनीची आघाडी वाढवली. मध्यंतरापर्यंत जर्मनीने भारतावर 3-0 अशी बढत मिळवली होती.
सामन्याच्या उत्तरार्धात भारतीय संघातील खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण बऱ्यापैकी ठेवले होते. 39 व्या मिनिटाला जर्मनीचा चौथा गोल पॉल बेबिकने केला. 50 व्या मिनिटाला भारतीय संघातील आघाडी फळीत खेळणाऱ्या सौरभ कुशावहने मैदानी गोल करुन जर्मनीची आघाडी थोडी कमी केली. जर्मनीच्या हेसबॅच बेनने 51 व्या आणि 54 व्या मिनिटाला असे 2 गोल नोंदवून या सामन्यात आपली हॅट्ट्रीक साधली. जर्मनीचा सातवा आणि शेवटचा गोल पॉल बेबिकने 55 व्या मिनिटाला नोंदविला. बेबिकचा या सामन्यातील हा दुसरा गोल आहे. आता या चौरंगी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाबरोबर रविवारी उशिरा होत आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून यजमान जर्मनी, भारत, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन हे चार संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्राथमिक फेरीत प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळेल. प्राथमिक फेरीतील आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. तसेच उर्वरित संघामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी प्लेऑफ सामने खेळविले जातील.