भारतीय हॉकी संघाचे ऑस्ट्रेलियास प्रयाण
6 एप्रिलपासून होणार 5 सामन्यांची कसोटी मालिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण केले असून तेथे हा संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारी ही मालिका 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सोमवारी रात्री ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून अलीकडेच भुवनेश्वर येथे झालेल्या एफआयएच प्रो लीगमध्ये चारपैकी तीन सामने भारताने जिंकले आहेत. 6 एप्रिलला पहिला सामना झाल्यानंतर 7, 10, 12 व 13 एप्रिल रोजी उर्वरित सामने खेळविले जातील. भारतीय संघाने सुधारित कामगिरी करणे आणि कच्च्या दुव्यांचा शोध घेऊन त्यात सुधारणा करणे हे या मालिकेचे मुख्य ध्येय आहे, असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.
‘ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर आम्ही जात असून निर्धार व उत्सुकता ठासून भरली आहे. या मालिकेतून आमच्या क्षमता आजमावून पाहण्याची आणि कमकुवत दुवे शोधून त्यावर काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे,’ अशं कर्णधार हरमनप्रीत सिंग प्रयाण करण्यापूर्वी म्हणाला. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्यास कटिबद्ध असून प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे उपकर्णधार हार्दिक सिंग म्हणाला. आपले कौशल्य, क्षमता, डावपेच वाढविण्यासाठी संघ म्हणून आम्ही कठोर मेहनत घेत आहोत. त्या दृष्टीने ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून शानदार प्रदर्शन करण्यास आम्ही सज्ज आहोत, असेही तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियास रवाना झालेला भारतीय हॉकी संघ : गोलरक्षक-कृशन बहादुर पाठक, पीआर श्रीजेश, सुरज करकेरा. डिफेंडर्स-हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, अमिर अली. मिडफिल्डर्स-मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंग, निलकांता शर्मा, राजकुमार पाल, विष्णुकांत सिंग. फॉरवर्ड्स-आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, गुर्जंत सिंग, मोहम्मद राहील मौसीन, बॉबी सिंग धामी, अरायजीत सिंग हुंदाल.