भारतीय हॉकी संघ अंतिम फेरीत
अझलन शहा हॉकी: कॅनडाचा एकतर्फी पराभव
वृत्तसंस्था / इपोह (मलेशिया)
शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेतील सामन्यात जुगराज सिंगच्या चार गोलांच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने कॅनडाचा 14-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता रविवारी या स्पर्धेत भागत आणि बेल्जियम यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने केवळ एक सामना गमविला. या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात बेल्जियमने भारतावर 1-0 असा निसटता विजय मिळविला होता. हा एकमेव पराभव वगळता भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेत आपले सर्वसामने ज्ंिांकून आपल्या गटात आघाडीचे स्थान घेत अंतिम फेरी निश्चित केली. भारताने न्यूझीलंडवर यापूर्वीच्या सामन्यात 3-2 असा थरारक विजय मिळविला होता.
शनिवारच्या सामन्यात भारताचा खेळ कॅनडाच्या तुलनेत सर्वाच विभागात दर्जेदार आणि आक्रमक झाला. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला निलकांत शर्माने भारताचे खाते उघडले. 10 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल राजिंदर सिंगने नोंदविला. वरिष्ठ गटात पदार्पण केल्यानंतर राजिंदर सिंगने या सामन्यात दर्जेदार खेळ केला. या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत कॅनडाने काही आक्रमक चाली रचत पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. 11 व्या मिनिटाला कॅनडाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला आणि त्यांच्या ब्रेंडन गुरालुईकने कॅनडाचे खाते उघडले. 12 व्या मिनिटाला जुगराज सिंगने भारताचा चौथा गोल तर 15 व्या मिनिटाला अमित रोहीदासने भारताचा पाचवा गोल केला. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने कॅनडावर 4-1 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडूंची खरी सत्वपरीक्षा होती. पण भारतीय संघातील नवोदित खेळाडूंनी अधिक आक्रमक खेळ करत कॅनडाच्या बचाव फळीवर चांगलेच दडपण आणले. 24 व्या मिनिटाला राजिंदर सिंगने भारताचा पाचवा गोल केला. 25 व्या मिनिटाला दिलप्रित सिंगने भारताचा सहावा गोल केला. 26 व्या मिनिटाला जुगराज सिंगने भारताचा सातवा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने कॅनडावर 7-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
सामन्यातील उत्तराधार्थ भारताची आक्रमणे अधिकच अचूक आणि परिणामकारक ठरल्याने कॅनडाला या सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत चांगलेच दमविले. मात्र याच कालावधीत कॅनडाने 35 व्या मिनिटाला आपला दुसरा गोल केला. कॅनडा संघातील मॅथ्यु सर्मेंटोने पेनल्टी स्ट्रोकवर हा गोल नोंदविला. 39 व्या मिनिटाला जुगराज सिंगने भारताचा आठवा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदविला. सेल्वम कार्तीने 43 व्या मिनिटाला भारताचा नववा गोल केला. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीतील खेळ केवळ औपचारिकता ठरली. या कालावधीत 6 गोल नोंदविले गेले. 46 व्या मिनिटाला रोहीदासने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दहावा गोल केला. 50 व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर भारताची आघाडी आणखीन वाढविली. भारताचा हा अकरावा गोल ठरला. ज्योत स्वरुप सिद्धूने कॅनडाचा तिसरा गोल केला. 56 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि संजयने या संधीचा फायदा घेत भारताचा 12 वा गोल केला. अभिषेकने 57 व्या आणि 59 व्या मिनिटाला असे दोन गोल करुन कॅनडाचे आव्हान 14-3 असे एकतर्फी संपुष्टात आणले.