स्पेनकडून भारतीय हॉकी संघ पराभूत
वृत्तसंस्था/ कोलालंपूर (मलेशिया)
विश्व हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत क गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पेनने भारताचा 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून पूर्ण गुण वसूल केले. या विजयामुळे स्पेनने क गटातून दोन सामन्यातून 6 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे.
क गटात कोरियाचा संघ सरस गोल सरासरीच्या जोरावर भारताला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण कोरियाने 6 गुणासह पहिले स्थान तर कोरियाने दुसरे आणि भारताने तिसरे स्थान मिळविले आहे. भारत आणि कोरिया या दोन्ही संघांनी समान 3 गुण मिळविले आहेत. या गटात कॅनडा चौथ्या स्थानावर आहे. कॅनडाने या स्पर्धेत आपले दोन्ही सामने गमविले असून आता त्यांचा क गटातील शेवटचा सामना भारता बरोबर शनिवारी खेळविला जाणार आहे.
या स्पर्धेत उत्तम सिंगच्या नेतृत्त्वाखाली भारतीय हॉकी संघाने क गटातील पहिल्या सामन्यात कोरियाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला होता. गुरुवारच्या सामन्यात भारताच्या तुलनेत स्पेनचा खेळ अधिक दर्जेदार झाला. या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठविता आला नाही. स्पेनतर्फे कॅब्रे व्हेरेडिल पॉलने पहिल्या आणि 41 व्या मिनिटाला असे 2 गोल नोंदविले. राफी अँड्रेसने 18 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. या सामन्यात 33 व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल रोहितने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला स्पेनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि अँड्रेसने स्पेनचा चौथा गोल केला.