भारतीय हिंदूना भ्याड समजू नये
मडगावातील भव्य हिंदू एकता रॅलीत इशारा : बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध,धर्मांतरावर केंद्र - राज्य सरकारने बंदी घालावी
मडगाव : भारतातील हिंदू हा भ्याड नाही. हिंदूनी कुणाचा द्वेश केलेला नाही किंवा जगात हिंदूनी कुठल्याच देशावर आक्रमण केलेल्याचा इतिहास नाही. मात्र, हिंदू राष्ट्र असलेल्या भारतावर आक्रमण झालेले आहे आणि त्याचा परिणाम आज आम्ही भोगत आहोत. मात्र, आज गरज भासली तर आम्ही कुणालाही भारी ठरू शकतो, असा इशारा मडगावात काल रविवारी झालेल्या हिंदू एकता रॅलीच्यावेळी माजी आमदार मोहन आमेशकर यांनी दिला. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी काल रविवारी मडगाव शहरात भव्य हिंदू एकता रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे दीड हजाराच्या आसपास हिंदू बांधव सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.
आक्रमणांमुळे देशाची नुकसानी
आपला देश हा एकेकाळी सुवर्णप्रांत होता. दोन हजार वर्षांपूर्वी सर्वजण सुशिक्षित होते. जात-पात नव्हती. सर्वजण संस्कृतमध्ये बोलत होते. ही हिंदू संस्कृती होती. गणित तसेच स्थापत्यकला इत्यादी क्षेत्रात आपला देश अग्रस्थानी होता. जगाच्या निर्यातीत 34 टक्के निर्यात आपला देश करत होता. नंतर देशावर आक्रमण झाले व हे सर्व नष्ट झाले असे, मोहन आमेशकर या प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले.
हिंदू कणखरपणे उभा रहावा
हे वैभव पुन्हा एकदा आपल्या देशाला मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी हिंदू समाज या ठिकाणी कणखररित्या पाऊल रोवून उभा राहिला पाहिजे. तेव्हाच इतर सर्वजण या ठिकाणी व्यवस्थित वागतील. हिंदू समाज हा सहनशील, प्रेमळ, आगत-स्वागत करणारा आहे. याचा अर्थ कुणी असा घेऊ नये की तो भ्याड आहे म्हणून. आणि जर कोणी असा समज करून घेत असेल तर ती त्यांची चूक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास मुंबई पेटली तेव्हा भिंवडीत गटारे कुणाच्या रक्ताने माखली होती, जेव्हा गोधरा प्रकरण झाले, तेव्हा गुजरातमध्ये काय झाले, याची आठवण करा. गोव्यात जेव्हा कुडचडेत असा प्रंसग निर्माण झाला, तेव्हा कुडचडेच्या लोकांनी त्यांना धडा शिकविला हे लक्षात घ्या. अशा प्रकारची पाळी हिंदू समाजावर आणू नका,अशी आपली नम्र विनंती असल्याचेही आमेशकर म्हणाले.
धर्मांतरण हे राष्ट्रांतरण...
धर्मांतरण हे राष्ट्रांतरण होय, त्यामुळे आपला देश जर सुरक्षित रहायचा असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारने धर्मांतरणाचा कायदा अमलात आणावा आणि जे कोणी फसवणूक करतात, लाचपूत देतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणारा कायदा या ठिकाणी केला पाहिजे, अशी मागणी मोहन आमशेकर यांनी केली.
त्या व्यवसायिकांवर कारवाई करावी
नगरपालिका किंवा पंचायतीना एक पैसाही न देता रस्त्याच्या बाजूला बसून तसेच फुटपाथ अडवून जे बिगरगोमंतकीय व्यवसाय करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कारण त्यांच्यामुळे कायदेशीर मार्गाने धंदा करणाऱ्या गोवेकरांवर अन्याय होत आहे. फोंडा, मडगाव व पणजी शहरात रस्त्याच्या बाजूला व फुटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महत्वाचे म्हणजे त्यात गोवेकर कुणीच नाही. त्यात रोहिंगे आहेत, असे आमशेकर म्हणाले.
भारताने बांगलादेशवर दबाव आणावा
भारतात अल्पसंख्यकांच्या विरोधात एखादी घटना घडली की, इतर देश भारतावर दबाव आणत असतात. त्याच पद्धतीने बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याने केंद्र सरकारने बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे, असे मत समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असून त्याला तेथील सरकार प्रोत्साहन देत असल्याने त्याचा आपण निषेध करतो. याच प्रकारच्या शक्ती भारतात असून अशा घटना भारतात घडू शकतात अशी विधाने केली जातात आणि भारत त्याच दिशेने जातो असे सांगितले जाते. आम्ही हे कदापी मान्य करणार नाही, असे मंत्री सुभाष फळदेसाई यावेळी म्हणाले.