चिनाब नदीवरील धरण प्रकल्पाला भारत सरकारने दिला वेग
जागतिक बँकेकडे 3119 कोटी रुपयांसाठी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारने 3119 कोटी रुपयांचे कर्ज एका प्रकल्पासाठी घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. भारत सरकारच्या या पावलामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. ही रक्कम जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे उभारण्यात येणाऱ्या रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण ‘क्वार धरण’ प्रकल्पाला वेगाने पूर्ण करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.
हा एक ग्रीनफील्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प असून यामुळे पाण्याच्या प्रवाहावर प्रभाव पडू शकतो. या धरणाच्या माध्यमातून 540 मेगावॅट वीजपुरवठा केला जाणार आहे. हे सुमारे 109 मीटर उंच काँक्रिट ग्रॅव्हिटी धरण असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4526 कोटी रुपये खर्च होणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये चिनाब नदीचा प्रवाह वळविण्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. हे कुठल्याही जलविद्युत प्रकल्पाकरता महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते. याचबरोबर 609 मीटर लांब मुख्य भुयाराचे खोदकाम सुरू झाले आहे. आता धरणाचे मुख्य निर्मितीकार्य वेगाने केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 एप्रिल 2022 मध्ये या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला होता. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण करत जम्मू-काश्मीरमधील वीजपुरवठा वाढवून औद्योगिक विकासाला चालना देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
पाकिस्तानवरील याचा प्रभाव
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करारावरून तणाव असताना हा प्रकल्प चर्चेत आला आहे. चिनाब ही सिंधू नदीचे प्रमुख उपनदी असून पाकिस्तान याच्या प्रवाहावर निर्भर आहे. भारताच्या या प्रकल्पामुळे पाकिस्तानला प्रवाह घटण्याची चिंता सतावू लागली आहे. परंतु भारताने आतापर्यंत कराराचे उल्लंघन केलेले नाही, पण कराराची पुनर्समीक्षा करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने आक्षेप नोंदविला जात असल्याने हा मुद्दा रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण ठरला आहे.