भारतीय फुटबॉल संघ बांगलादेशकडून पराभूत
वृत्तसंस्था/ढाका
आशियाई चषक पात्रता फेरीच्या गट ‘क’मधील सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला बांगलादेशविऊद्ध 22 वर्षांनंतर पहिला पराभव पत्करावा लागला. यजमान संघाकडून त्यांन 0-1 असा पराभव पत्करावा लागला. येथे राष्ट्रीय स्टेडियमवर प्रेक्षकांच्या जोरदार जल्लोषात शेख मोरसालिनने 11 व्या मिनिटाला बांगलादेशसाठी सर्वांत महत्त्वाचा गोल केला.
तथापि, हा सामना निरर्थक ठरला. कारण दोन्ही संघ 2027 च्या खंडीय स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 31 व्या मिनिटाला भारताकडे गोल करण्याची संधी होती. परंतु बांगलादेशचा गोलरक्षक मितुल मार्मा पूर्णपणे आपल्या जागेवर नसताना गोलक्षेत्राच्या आरंभाच्या भागातून ललियानझुआला छांगटेने उजव्या पायाने हाणलेला फटका हमजा चौधरीने हेड करून बाहेर टाकला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंमध्ये टच लाईनजवळ धक्काबुक्की होण्याची घटना घडली, परंतु पंचांनी त्यावर नियंत्रण मिळवले.
भारताचा बांगलादेशविऊद्ध शेवटचा पराभव 2003 च्या सॅफ गोल्ड कपमध्ये झाला होता. ढाका येथील याच ठिकाणी झालेल्या सॅफ गोल्ड कप सामन्याध्ये बांगलादेशने 2-1 असा विजय मिळवला होता. तेव्हापासून ताज्या लढतीपूर्वी दोन्ही संघांमध्ये 9 सामने झाले होते. त्यात भारताने तीन विजय मिळविले होते आणि उर्वरित सामने बरोबरीत संपले होते. 2027 च्या आशियाई चषक स्पर्धेसाठीची भारताची मोहीम 14 ऑक्टोबर रोजी गोव्यातील मडगाव येथे झालेल्या सामन्यात सिंगापूरविरुद्ध 1-0 अशी मिळविलेली आघाडी गमावून शेवटी 1-2 असा पराभव पत्करावा लागल्याने संपली होती.
ताज्या पराभवामुळे एकही विजय खात्यात नसलेला भारत पाच सामन्यांतून फक्त दोन गुणांसह चार संघांच्या गुणतालिकेत तळाशी राहिला आहे. पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीतील हा त्यांचा तिसरा पराभव होता. इतर दोन सामने अनिर्णित राहिले. पाच सामन्यांतील पहिला विजय मिळविणारा बांगलादेश पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. दोन्ही संघांमधील पहिल्या टप्प्यातील सामना 25 मार्च रोजी शिलाँगमध्ये गोलशून्य बरोबरीत संपला होता. दरम्यान, हाँगकाँगला 2-1 ने हरवणाऱ्या सिंगापूरने 11 गुणांसह गट ‘क’मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे आणि 2027 च्या आशियाई चषकासाठी पात्रता मिळवली आहे.