सुपर स्ट्रायकर सुनील छेत्रीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
6 जून रोजी कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना : ख्रिस्तियानो रोनाल्डो-मेस्सीनंतर जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल
वृत्तसंस्था /बेंगळूर
भारतीय संघाचा कर्णधार व दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या छेत्रीने गुरुवारी, 16 मे रोजी निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. काही वर्षापूर्वी भारताचा दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भूतियाने निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढे कोण, असा प्रश्न पडला होता. अल्पावधीतच सुनील छेत्रीने भूतियाची जागा घेत हा प्रश्न निकाली काढला होता. आता, छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारतीय फुटबॉलचा नवा तारणहार कोण हा प्रश्न असणार आहे. दरम्यान, भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. छेत्रीचा हा शेवटचा सामना असेल. क्लब फुटबॉलमध्ये मात्र एफसी बेंगळूर संघाकडून आपण खेळत राहू, असे त्याने सांगितले. बायचुंग भूतियाने फुटबॉलला अलविदा केल्यानंतर गेल्या काही वर्षापासून सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा चेहरा आहे. आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 150 सामन्यात 94 गोल केले आहेत. विशेष म्हणजे, तो सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अचानक निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना चांगलाच धक्का दिला. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते. हे सारे क्षण मी कधीच विसरु शकणार नाही, असे 39 वर्षीय छेत्रीने सांगितले.
भारतीय फुटबॉलचा तारणहार
15 एप्रिल 2005 रोजी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या छेत्रीने धमाकेदार खेळीने अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. बायचुंग भूतियानंतर त्याने दीड दशके भारतीय फुटबॉलची कमान सांभाळली. तब्बल 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने अनेक चढउतार पाहिले. 12 जून 2005 रोजी त्याने पाकिस्तानविरूद्ध सामन्यातून पदार्पण केले. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने फुटबॉल कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता, छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे.
भारताकडून सर्वाधिक गोल
सुनील छेत्रीने आत्तापर्यंत भारतासाठी सर्वाधिक 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 150 सामन्यात त्याने एकूण 94 गोल केले. जे भारतासाठी सर्वोच्च आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावे आहेत. त्याने 128 गोल केले आहेत. या यादीत इराणचा अली देल 108 गुणासह दुसऱ्या, अर्जेटिनाचा लायोनल मेस्सी 106 गुणासह तिसऱ्या तर भारताचा सुनील छेत्री 94 गोलसह चौथ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, भारताच्या कोणत्याही फुटबॉलपटूला अशी कामगिरी करता आलेली नाही.
कुवेतविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
6 जून रोजी कोलकाता येथे होणारा कुवेतविरुद्ध सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील शेवटचा सामना असेल. हा सामना फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीचा भाग आहे. टीम इंडिया ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानी कतार आहे. यानंतर भारताचा पुढील सामना 11 जून रोजी कतारविरुद्ध होणार आहे. दरम्यान, गटातील अव्वल दोन संघ फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. यामुळे टीम इंडिया आणि सुनील छेत्रीसाठी हा शेवटचा सामना संस्मरणीय ठरणार आहे.
फिटनेस, डाएट ते यशस्वी फुटबॉलपटू
मैदानामध्ये कुशल आणि प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या चाली रचणे हे सुनील छेत्रीचं वैशिष्ट्या. याचबरोबर त्याचा फिटनेस अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. छेत्रीने नेहमीच फिटनेसवर लक्ष दिले. प्रत्येक खेळाडूला यशस्वी होण्यासाठी फिटनेस आणि डाएटची शिस्त पाळणे आवश्यक असते. छेत्रीने आपल्या कारकिर्दीत ही शिस्त नेहमीच पाळली. आजच्या घडीला भारतातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू म्हणून तो गणला जातो.
विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट
सुनील छेत्रीच्या या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज विराट कोहलीने कमेंट केली. सुनील छेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओवर विराट कोहलीने माझा भाऊ...गर्व आहे, (My Brother Proud) अशी कमेंट केली आहे. विराट कोहलीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.