भारतीय चालकाकडून 10 वाहनांना धडक
तिघांचा मृत्यू : अमेरिकेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था/कॅलिफोर्निया
पंजाबमधील एका ट्रकचालकाने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सुमारे 10 वाहनांना धडक दिल्यामुळे तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी घडला. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातप्रकरणी जशनप्रीत सिंग या भारतीय नागरिकाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. जशनप्रीत सिंग हा पंजाबचा रहिवासी आहे. त्याच्यावर मद्यपान करून गाडी चालवताना झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
अमेरिकन एजन्सींनुसार, जशनप्रीत सिंग हा भारतीय नागरिक आणि बेकायदेशीर स्थलांतरित आहे. त्याला मार्च 2022 मध्ये कॅलिफोर्निया सीमेवर अटक केल्यानंतर सोडण्यात आले होते. सध्या त्याला सॅन बर्नार्डिनो काउंटी शेरीफ विभागाने ताब्यात घेतले आहे. जशनप्रीतच्या ताब्यानंतर आता इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने त्याच्याविरुद्ध अटकेची विनंती दाखल केली आहे. अपघातावेळी सिंग वेगात आणि मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याला ब्रेक लावता आला नसल्यामुळे समोरून येणाऱ्या बऱ्याच वाहनांना धडक बसली.
ट्रक अपघातांमुळे अमेरिकेत दरवर्षी 6,000 मृत्यू
ट्रक अपघातांमुळे अमेरिकेत दरवर्षी सरासरी 6,000 लोकांचा मृत्यू होतो. 2022 मध्ये मोठ्या ट्रक अपघातांमध्ये 5,936 लोकांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, 2023 मध्ये ट्रकने धडकल्याने अमेरिकेत 5,472 लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत भारतीय ट्रक चालकांची संख्या बरीच जास्त आहे. अमेरिकेत अंदाजे 15,961 भारतीय ट्रकचालक आहेत. त्यापैकी बहुतेक मूळ पंजाबचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.