सौदीत भूकेने तडफडून भारतीयाचा मृत्यू
जीपीएस फेल झाल्याने वाळवंटात हरवला
वृत्तसंस्था/ रियाध
सौदी अरेबियात काम करत असलेला 27 वर्षीय भारतीय नागरिक मोहम्मद शेहजाद खान याचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाचा रहिवासी असलेला शेहजाद हा सौदी अरेबियातील रुब-अल खाली या वाळवंटात अडकला होता, याला जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक मानले जाते.
शेहजाद हा सुदानमधील एका मित्रासोबत या भागातून जात असताना त्यांचा जीपीएस सिग्नल फेल झाला होता. याच्या काही वेळानंतर त्यांच्या वाहनातील इंधन आणि फोनची बॅटरीही संपुष्टात आली होती, यामुळे त्यांना कुणाकडूनच मदत मागता आली नाही.
शेहजाद आणि त्याचा मित्र दीर्घकाळापर्यंत वाळवंटातील उष्णतेत पाणी, अन्नाशिवाय राहिले होते. उपाशी अन् तहानलेला राहिल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि दोघांचा मृत्यू झाला. शेहजाद आणि त्याच्या मित्राचा मृतदेह 4 दिवसांनी वाळवंटात त्यांच्या बाइकनजीक सापडला आहे. शेहजाद मागील तीन वर्षांपासून सौदी अरेबियाच्या एका दूरसंचार कंपनीत काम करत होता.
रुब-अल खालीला एम्प्टी डेझर्ट देखील म्हटले जाते. हे अरब वाळवंटाचा सर्वात मोठा हिस्सा असून सौदी अरेबियाच्या एकूण क्षेत्रफळाच्या एक चतुर्थांश इतके आहे. रुब-अल खाली 650 किलोमीटरपर्यंत फैलावलेले आहे. सौदी अरेबियाचा दक्षिण हिस्सा आणि शेजारी देश ओमान, युएई आणि येमेनपर्यंत हे वाळवंट फैलावलेले आहे.
रुब-अल खालीच्या मोठ्या हिस्स्याला आतापर्यंत एक्स्प्लोर करण्यात आलेले नाही. या वाळवंटात पेट्रोलियमचे मोठे भांडार आहेत. 1948 मध्ये या वाळवंटाच्या उत्तर-पूर्व भागात अल-गवारमध्ये जगातील सर्वात मोठा पेट्रोलियम साठा मिळाला होता. सौदी अरेबियाची राजधानी रियाधपासून 260 किलोमीटर अंतरावर अल-गवारमध्ये तेलाचे अब्जावधी बॅरल्सचे साठे आहेत.