भारतीय क्रिकेट संघाने ‘रुटीन’ला चिकटून रहावे
दडपण हाताळण्यासंदर्भात दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्राचा सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्राने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर होणार असलेल्या न्यूझीलंडविऊद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यापूर्वी दडपण कसे हाताळायचे याबद्दल ‘टीम इंडिया’ला एक मन:पूर्वक संदेश दिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने साखळी टप्प्यातील नऊ सामन्यांतून नऊ विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकू शकणारा भक्कम दावेदार या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ‘ट्विटर’) बिंद्राने भारतीय संघाला त्यांच्या ‘रुटीन’ला चिकटून राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यामुळेच दबावाचे रुपांतर कामगिरीमध्ये होते, याकडे त्याने लक्ष वेधले आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीची तयारी करत असताना दबाव कसा हाताळावा यासाठी माझे हे दोन सल्ले आहेत. खरे तर त्यांनी आतापर्यंत केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्यांना दडपणाबाबत काही धडे घेण्याची गरज नाही, असेही बिंद्राने म्हटले आहे.
‘लक्षात ठेवा, सध्याचा क्षण हा एका अचूक फटक्यासारखा आहे. तुमच्या हाती आहे ते तेवढेच. त्यावर लक्ष केंद्रीत करून रहा. तुमचे ठरलेले रुटीन म्हणजे जणू विधी आहे. त्यामुळे दबाव कामगिरीत बदलतो. त्याला चिकटून राहा, पण गुगली टाकायला घाबरू नका आणि गरज असेल तेव्हा परिस्थितीशी जुळवून घ्या, असाही सल्ला त्याने दिला आहे. ‘संकट? ’मी इतिहास घडवणार आहे’ यासाठीचा हा आणखी एक शब्द आहे. जेव्हा वाटचाल कठीण होते, तेव्हा कणखर असलेले केवळ पुढेच जात नाहीत, तर ते खोल खणतात आणि तिथेच एक गगनचुंबी इमारत बांधतात’, असे बिंद्राने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिंद्राने दबावाची तुलना सायंकाळच्या सावलीशी केली आहे. ‘दबाव हा सायंकाळच्या सूर्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या तुमच्या सावलीसारखा असतो. तो दबाव मोठा दिसू शकतो, पण तो क्रिकेटच्या चेंडूपेक्षा जड नसतो. त्यापासून दूर पळू नका. त्याला सामोरे जा आणि तुम्ही त्याच्यासमवेत खेळपट्टीवर पदन्यास करायला शिकाल. म्हणून पुढे जा आणि त्याला पार्कच्या बाहेर फेका. पण जर तुम्ही अडचणीत सापडलात, तर दीर्घ श्वास घ्या आणि शांत डोके सोडवू शकत नाही असे काहीही नाही हे लक्षात ठेवा’, असे बिंद्राने म्हटले आहे.