ऑस्ट्रेलियात हत्या करणारा भारतीय ठरला दोषी
7 वर्षांनी पीडित परिवाराला मिळाला न्याय
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये 7 वर्षांपूर्वी वांगेटी बीचवर 24 वषींय टोया कॉर्डिंग्ले या युवतीची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी भारतीय वंशाचा नागरिक राजविंदर सिंह याला केर्न्स सुप्रीम कोर्टाने दोषी ठरविले आहे.
21 ऑक्टोबर 2018 रोजी टोया ही पाळीव श्वानांसोबत बीचवर फिरत असताना राजविंदर सिंह तेथे पोहोचला. घरात पत्नीसोबत भांडण झाल्याने तो चाकू घेऊन बाहेर पडला होता. टोयाचा श्वान त्याच्या दिशेने जोरजोरात भुंकू लागल्याने राजविंदर चिडला होता. शाब्दिक चकमक उडाल्यावर संतापाच्या भरात राजविंदरने टोयावर चाकूने सपासप वार केले होते. त्यानंतर त्याने टोयाचा मृतदेह वाळूत पुरला होता तर श्वानाला एका नजीकच्या झाडाला बांधले होते.
हत्येच्या दोन दिवसांनी राजविंदर हा ऑस्ट्रेलियातून फरार झाला होता, त्याने नोकरी सोडली अणि पत्नी तसेच तीन अपत्यांना तेथेच सोडून तो गायब झाला होता. चार वर्षांपर्यंत त्याने स्वत:च्या कुटुंबाशी कुठल्याही प्रकारे संपर्क केला नव्हता. राजविंदर विरोधात क्वीन्सलँड पोलिसांनी 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे इनाम घोषित केले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने राजविंदरला दिल्लीतील एका गुरुद्वारातून अटक केली होती. 2023 साली त्याला भारतातून ऑस्ट्रेलियात प्रत्यार्पित करण्यात आले होते.