तिरंदाजी प्रीमियर लीगसाठी भारतीय स्पर्धकांची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या आयपीएलच्या धर्तीवर तिरंदाजी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजपटूंची घोषणा केली आहे. सदर स्पर्धा पुरूष आणि महिला विभागात रिकर्व्ह आणि कंपाऊंड अशा दोन प्रकारामध्ये घेतली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये जगातील विविध देशांचे अव्वल तिरंदाजपटू सहभागी होणार आहेत. आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर या स्पर्धेतही फ्रांचायझींचा सहभाग राहील. या स्पर्धेसाठी जागतिक तिरंदाजपटूंच्या मानांकनातील आघाडीच्या 10 तिरंदाजपटूंना त्याचप्रमाणे विश्व मानांकनातील पहिल्या 20 तिरंदाजपटूंना संधी देण्यात येणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारे तिरंदाजपटू दीपिका कुमारी तसेच धिरज बोमदेवरा यांच्या नावांचा समावेश आहे. रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात दीपिका कुमारी, धिरज बोमदेवरा तसेच कंपाऊंड प्रकारातील भारतीय जोडी ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम, प्रथमेश फुगे, प्रियांश आणि परणीत कौर या या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी अलिकडेच अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेने निवड चाचणी घेतली. या चाचणीनंतर रिकर्व्ह प्रकारात भारताचे ज्येष्ठ ऑलिम्पियन तिरंदाजपटू तरुणदीप राय, अतेनु दास तसेच महिलांच्या विभागात अंकित भक्त आणि भजन कौर हे सहभागी होणार आहेत. रिकर्व्ह प्रकारासाठी निरज चौहान, राहुल, रोहीतकुमार, मृणाल चौहान, सचिन गुप्ता, कृशकुमार, तर महिलांच्या विभागात शर्वरी शेंडे, बसंती महातो, कुमकुम मोहोड, तिशा पुनिया आणि अनशिखा कुमारी या स्पर्धेत भाग घेत आहेत.
कंपाऊंड पुरुषांच्या प्रकारात अमन सैनी, ओजस देवतळे, साहील जाधव, सी. जिग्नास, पुलकित काजला, तर महिलांच्या विभागात प्रितीका प्रदीप, तानीपार्थी चिकिता, अवनित कौर, मदला सूर्या, स्वाती दुधवाल, मधुरा धामणगावकर आणि प्रांजल साळवे, या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असून ती 11 दिवस चालणार आहे. सहा फ्रांचायझी तिरंदाजपटूंची निवड करतील.