भारतीय नागरीकाचे ‘निर्वासन’ रोखले
43 वर्षे बंदीवासातून सुटका, अमेरिकेतील घटना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेच्या कारागृहात तब्बल 43 वर्षे चुकीने डांबल्या गेलेल्या भारतीय वंशाच्या नागरीकाची सुटका करण्याचा आदेश तेथील न्यायालयाने दिला आहे. या नागरीकाची सुटका करण्यात आल्यानंतर त्याचे निर्वासन (डीपोर्टेशन) करण्याचा निर्णय अमेरिकेच्या प्रशासनाने घेतला होता. तथापि, या निर्णयावर स्थगिती देऊन अमेरिकेच्या न्यायालयाने या नागरीकाला आणखी एक दिलासा दिला आहे.
अमेरिकेच्या दोन न्यायालयांनी हा निर्णय दिला आहे. सुब्रम्हणियम वेदम् असे या नागरीकाचे नाव आहे. त्याचे आजचे वय 64 वर्षे आहे. त्याला गेली 43 वर्षे अमेरिकेतील लुईझानिया प्रांतात कारागृहात ठेवण्यात आले होते. या कारागृहाजवळ एक विमानतळ असून सुटका झालेल्या बंदींचे या तळावरुन थेट त्यांच्या देशात निर्वासन केले जाते. मात्र या बंदीचे निर्वासन अमेरिकेच्या न्यायालयाने रोखले आहे. त्याची सुटका करण्याचा जो निर्णय न्यायालयाने दिला, त्या विरोधात अमेरिकेच्या प्रशासनाला अपील करायचे असल्यास तो निर्णय होईपर्यंत त्याचे निर्वासन करु नये, असा अंतरिम आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.
वेदम् यांच्यावर घोर अन्याय
वेदम् हे केवळ 9 महिन्यांचे असताना आपल्या मातापित्यांसमवेत अमेरिकेत आले. नंतर ते अमेरिकेतच मोटे झाले. त्यांनी आपला मित्र थॉमस किन्सन याची 1980 मध्ये हत्या केली, असा आरोप त्यांच्यावर 1982 मध्ये ठेवण्यात आला. किन्सर याचा मृतदेह तो बेपत्ता झाल्यापासून 8 महिन्यांच्या नंतर आढळून आला होता. वेदम् हे किन्सर बेपत्ता होण्यापूर्वी त्याला भेटलेले शेवटचे व्यक्ती होते. केवळ एवढ्या आधारावर त्यांना बंदीवासात ठेवण्यात आले होते. त्यांना 1983 मध्ये दोषी ठरविण्यात आले आणि आजन्म कारावाची शिक्षा देण्यात आली. त्यांच्यावर अंमली पदार्थांसंबंधातही गुन्हा सादर करण्यात आला आणि त्यात त्यांना अडीच ते पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली. वेदम् यांनी कोणताही गुन्हा केला नसून त्यांना केवळ गैरसमजुतीतून शिक्षा देण्यात आली आहे, असा बचाव त्यांच्या वकीलांनी उच्च न्यायालयात केला. पेन्सिलव्हानिया येथील उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवत त्यांची निर्दोष सुटका केली. पण त्यांना तब्बल 43 वर्षे कारागृहात विनाकारण घालवावी लागली. कारागृहाच्या वास्तव्यात त्यांनी अभ्यास करुन तीन पदव्याही प्राप्त केल्या आहेत. 3 ऑक्टोबर 2025 त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. पण त्यांचे निर्वासन करण्यासाठी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. मात्र, आता त्यांच्या निर्वासनाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे.