भारतीय उद्योजकाचा युगांडा सरकारवर आरोप
मुलीला बळजबरीने डांबून ठेवल्याचा दावा
वृत्तसंस्था / झ्यूरिच
भारतीय वंशाचे स्वीस उद्योजक पंकज ओसवाल यांची कन्या वसुंधरा ओसवालला युगांडांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. माझ्या मुलीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले असल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला आहे. माझ्या मुलीला मूलभूत अधिकारांपासून देखील वंचित ठेवण्यात आले आहे. कुटुंबीय तसेच कायदेशीर प्रतिनिधीशी संपर्क साधू दिला जात नाही असा दावा पंकज ओसवाल यांनी युगांडाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. वसुंधरा ओसवाल ही पीआरओ इंडस्ट्रीजची कार्यकारी संचालित असून एक ऑक्टोबरपासून तिला सुनावणीशिवाय कैद करण्यात आले आहे.
वसुंधराला कैदेत ठेवण्यामागे कॉर्पोरेट आणि राजकीय दबाव कारणीभूत आहे. माझ्या एका माजी कर्मचाऱ्याने निराधार आरोप केले आहेत. या कर्मचाऱ्याने कंपनीच्या मूल्यवान गोष्टी चोरल्या आहेत. याचबरोबर आमच्या कुटुंबाला हमीदार दर्शवून 2 लाख डॉलर्सच्या कर्जाची उचल केली असल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला आहे. ओसवाल यांनी याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाकडेही दाद मागितली आहे. न्यायालयाने वसुंधराला विनाअट मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. तरीही पोलीस जाणूनबुजून तिला जामीन मिळू नये अशाप्रकारचे गुन्हे नोंद करत असल्याचा आरोप ओसवाल यांनी केला.