भारतीयांच्या ‘बायकॉट बॉम्ब’ने तुर्की, अजरबैजानचं पर्यटन कोलमडलं
दोन्हीही देशांना बसणार हजारो कोटींचा फटका : तुर्की टुरिझमने भारतीय पर्यटकांसमोर जोडले हात
पुण्याच्या फळ विक्रेत्यांनीही तुर्की सफरचंदांच्या काही कोटींच्या ऑर्डर केल्या रद्द
‘बायकॉट तुर्की आणि बायकॉट अजरबैजान’ हा ट्रेन्ड राबवत भारतीय पर्यटकांनी अवघ्या आठवडाभरातच या दोन्ही देशांना अक्षरश: गुडघ्यावर आणत त्यांनी पाकिस्तानला केलेल्या मदतीचा बदला घेतला. भारतीय पर्यटकांनी घेतलेल्या या निर्णयाचा तुर्कस्तानला यावर्षात एक हजार कोटींचा, तर अजरबैजानलादेखील काही हजार कोटींचा फटका बसणार आहे. एवढच नव्हे तर भारतीय फळविक्रेत्यांनीदेखील तुर्कीतून येणाऱ्या सफरचंदांची खरेदी थांबवली असून याचाही या देशाला हजार ते बाराशे कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. अशा पद्धतीने देशप्रेमी भारतीय पर्यटक व व्यापाऱ्यांनी या दोन्ही देशांना चांगलाच धडा शिकवला आहे.
2023 मध्ये तुर्कीमध्ये प्रलयंकारी भूकंप झाला होता. त्यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. तर अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसानही झाले होते. अशा कठीण प्रसंगी उर्वरित जगाने तटस्थ भूमिका घेतली असताना भारताने ताबडतोब ‘ऑपरेशन दोस्ती’ अभियान राबवत या देशाला तातडीची मदत पाठवत साऱ्या जगाला मानवतेचा संदेश दिला होता. काही दिवसांपूर्वी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर हल्ला करून मानवतेला काळिमा फासणारे हत्याकांड घडवून आणले. याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ले करीत प्रतिशोधाची कारवाई केली. भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या पाकला मदत म्हणून तुर्की व अजरबैजान या दोन्ही देशांनी उघडपणे पाठिंबा जाहीर तर केलाच, पण त्याचबरोबर तुर्कीने भारताचा हल्ला मोडून काढण्याकरीता पाकला लष्करी ड्रोन, मिसाईल्स आणि एअरडिफेन्स यंत्रणा पुरवली. मात्र अवघ्या काही दिवसांत तुर्कीला त्यांच्या गद्दारीची किंमत चुकवणं भारताने भाग पाडलं. तुर्की आणि अजरबैजान या दोन्ही देशांची आर्थिक मुस्कटदाबी करीत भारताने अवघ्या आठवडाभरात या दोन्ही देशांना अक्षरश: गुडघ्यावर आणलं. एवढं करून भारत थांबला नाही, तर भारतीय सैन्याने तुर्कीने पुरवलेले ड्रोन, मिसाईल आणि त्यांची एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त करीत या देशांना चोख प्रत्त्युत्तर दिले.
तुर्की हा एक इस्लामिक देश आहे. मात्र तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशसारखा भिकेकंगाल नाही, तो एक सधन देश आहे. 7 मे रोजी भारताने पाकिस्तानवर कारवाई सुरू केली. ही कारवाई भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतिक होतं. पण नेमक्या याचवेळेला तुर्की आणि अजरबैजान या दोन्ही देशांनी भारताचा तीव्र शब्दात निषेध करीत पाकिस्तानला उघड पाठिंबा जाहीर केला.
‘बायकॉट ट्रेंड’ने शिकवला धडा
तुर्की आणि अजरबैजान यांची ही गद्दारी लक्षात येताच संतापलेल्या भारतीय पर्यटकांनी ‘बायकॉट तुर्की, बायकॉट अजरबैजान’ हे ट्रेण्ड सुरू केले. भारतीय पर्यटक हे जगातील सर्वात जास्त व्यवसाय देणारे पर्यटक म्हणून ओळखले जातात. या भारतीय पर्यटकांनी आता या दोन्ही देशांमध्ये पाऊल ठेवायचे नाही, असं ठरवलं. त्यामुळे इज माय ट्रीप, एक्सीगो, कॉक्सन अॅण्ड कॉक्सन किंग या आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की आणि अजरबैजानबरोबरचे आपले करार तात्काळ रद्द केले. या कंपन्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजमधून या दोन्ही देशांना काढून टाकलं. तेथील हॉटेल्स आणि विमानांचं बुकिंगदेखील बंद केलं. या कंपन्यांनी हे केलं नसतं, तर या कंपन्यांनाही त्याचा फटका बसला असता. याव्यतिरिक्त अनेक कंपन्यांनी तुर्कीची तिकिटे आणि आपली हॉलिडे पॅकेजीस रद्द केली.
तुर्कीबाबत बोलायचं झाल्यास 2024 मध्ये 2.3 लाख भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली होती. त्यातून जवळपास एक हजार कोटींचे उत्पन्न तुर्कीला मिळाले होते. मागील 10 वर्षांत तुर्कीला जाणाऱ्या भारतीयांची संख्या तीनपटीने वाढली होती. तर अजरबैजानमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मागील दहा वर्षांत तब्बल 50 पटीने वाढ झाली होती. अजरबैजानमध्ये मागील 2024 या वर्षात 2.4 लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. पूर्वी फक्त या देशामध्ये सरासरी पाच हजार भारतीय पर्यटक भेट द्यायचे. भारत या अजरबैजानसाठी चौथ्या क्रमांकाचा ‘टॉप टूरिस्ट कंट्री’ ठरला आहे.
पुण्याच्या व्यापाऱ्यांनीही काढला वचपा
एक्सीगो या टॉप टूरिस्ट कंपनीने ‘एक्स’वर आम्ही सर्वजण भारतासोबत असल्याचे ट्विट करीत तुर्की, अजरबैजान आणि चीन या तीन देशांसोबतचे टूर करार मोडीत काढले. जेव्हा प्रश्न भारतीय अस्मितेचा असतो, तेव्हा आम्ही अन्य कोणत्याही देशाचा विचारच करू शकत नाही, असेही त्यांनी ट्विट केलंय. हे कमी की काय, पुण्यातील फळ विक्रेत्यांनी तुर्कीतून भारतात येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार जाहीर केला आहे. तुर्की भारताला दरवर्षी एक हजार ते बाराशे कोटी रुपयांची सफरचंद विकतो. तीही अवघ्या तीन महिन्यांत. त्यावरही आता बंदी येणार आहे. कारण फळ विक्रेतेच विचारतात, लोकच आता तुर्कीची सफरचंद घेणार नाही, असे म्हणतात. मग आम्ही ती विकायची कुठे? या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून येणाऱ्या सफरचंदांच्या ऑर्डरच रद्द केल्या आहेत.
तुर्की गुडघ्यावर
आता या सगळ्याचा असा परिणाम झाला की, अवघ्या काही दिवसांतच जबरदस्त आर्थिक फटका बसल्याने तुर्की गुडघ्यावर आला आहे. तुर्कीच्या टुरिझम डिपार्टमेंटने ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘भारतीयांनो, तुमचे ट्रॅव्हल प्लॅन पुढे ढकलू नका. तुर्कीमध्ये आम्ही तुमचे स्वागत करतो. तुर्की अतिशय सुरक्षित आहे. आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ.. वगैरे वगैरे.” तुर्कीच्या या ट्विटला उत्तर देताना भारतीय पर्यटक म्हणतात, तुमची सर्व्हिस, तुमची सेफ्टी या गोष्टींचा आम्हाला फरकच पडत नाही. तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा दिलाय ना. आता तुम्ही पाकिस्तानी टुरिस्टनाच बोलवा. त्यांनाच काय ती सर्व्हिस द्या. याउलट तुर्कीच्या शेजारी असलेल्या ग्रीसने भारतीयांना आता निमंत्रण धाडलंय. तुम्ही आमच्याकडे या. जे तुर्की देतंय, ते सर्व आम्ही देऊ. त्यामुळे आता भारतीय पर्यटक तुर्कीवर फुली मारून ग्रीसला चालले आहेत. या घडामोडींमुळे तुर्कीच्या टुरिझम मार्केटमध्ये घबराट पसरली आहे. अजरबैजानचं मार्केट तर येत्या काही दिवसात आपणास बरबाद झालेलं दिसेल. कारण मागच्या तीन-चार वर्षांत अजरबैजानचं मार्केट भारतीय पर्यटकांमध्ये एवढं पॉप्युलर झालं की, या देशासाठी भारत ही चौथ्या क्रमांकाची टूरिस्ट कंट्री ठरली आहे.
‘टुरिझम आणि टेररिझम’ हे एकत्र राहू शकत नाहीत
भारतीय पर्यटक म्हणतात, जे आम्ही तुम्हाला पैसे देणार त्याचा उपयोग तुम्ही आमच्याच शत्रूला मदत करण्यासाठी करणार व आमचं रक्त सांडवणार. त्यामुळे आमची आपल्या देशात येण्याची अजिबात इच्छा नाही. मोदी म्हणतात, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. त्याचप्रकारे टुरिझम आणि टेररिझम हे एकत्र राहू शकत नाहीत. भारतीय पर्यटकांनी तुर्की व अजरबैजानला ठणकावलं आहे. मागच्या वर्षी मालदीवच्या एका नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोंदींविरुद्ध एक अपशब्द वापरल्यावर भारतीय पर्यटकांनी मालदीव बायकॉट केला. त्यामुळे सदर देशाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. आता तीच अवस्था तुर्की आणि अजरबैजानची होणार, हे आता स्पष्ट दिसू लागले आहे.
टी-शर्टपासून साड्यांपर्यंत... देशभक्तीपर वस्तूंना सर्वत्र वाढती मागणी
पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील विविध बाजारपेठांमध्ये देशभक्तीपर वस्तूंचा पूर आला आहे. ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू झाले. तथापि, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. यानंतर, टी-शर्टसह अनेक वस्तूंवर ऑपरेशन सिंदूर, क्षेपणास्त्रांचे फोटो इत्यादींशी संबंधित घोषणा दिसू लागल्या. सध्या अशाप्रकराचे टी-शर्ट बाजारात आले असून त्यावर ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आठवणी छापलेल्या निदर्शनास येत आहेत. तसेच सिंदूर पावडरची विक्रीही वाढली असून महिलावर्गामध्ये सिंदूर साड्यांची चलतीही दिसून येत आहे.
भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर एअर मार्शल ए. के. भारती यांची दोन जबरदस्त उत्तरे सोशल मीडियावर व्हायरल झाली. हिमाचल प्रदेशातील परवानु येथील 34 वर्षीय उद्योजक आदि अरोरा यांनी ती उत्तरे तातडीने टी-शर्टवर छापली. एका टी-शर्टवर डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स भारती यांचा प्रसिद्ध संवाद लिहिला होता. ‘आमचे काम लक्ष्य ठेवणे आहे, मृतदेह मोजणे नाही.’ असा आशय त्यात दिसतो. तर दुसऱ्या टी-शर्टवर ‘किराणा हिल्समध्ये काय आहे ते मला माहित नाही.’ असा संदेश आहे. पाकिस्तानच्या अणुऊर्जा केंद्रावर हवाई दलाने हल्ला केल्याबद्दल विचारणा केली असता भारती यांनी हे उत्तर दिले होते.
टी-शर्टवर हल्ल्यांची ठिकाणे
कोलकाता येथील व्यावसायिक पायलट आणि एरो आर्मरचे संस्थापक अनिश अग्रवाल यांनी एक पाऊल पुढे जाऊन सिंदूर टी-शर्ट तयार केले आहेत. एरो आर्मर गेल्या पाच वर्षांपासून लष्करी शैलीतील कपडे विकत आहेत. आता त्यांनी टी-शर्टवर भारताने जिथे हल्ला केला ती ठिकाणे दाखवली आहेत. या ब्रँडने यापूर्वी कारगील, मेघदूत आणि ब्लॅक टॉर्नेडो सारख्या संरक्षण मोहिमांवर संग्रह तयार केले आहेत.