भारतीय मुष्टियुद्ध संघ बहरीनला रवाना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बहरीनमधील मनामा येथे 23 ऑक्टोबरपासून तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा 23 सदस्यांचा मुष्टीयुद्ध संघ बहरीनला रवाना झाला.
भारतीय मुष्टीयुद्ध संघामध्ये ध्रुव खर्ब, उदामसिंग राघव, खुशी चंद, अहाना शर्मा, चंद्रिका पुजारी यांचा समावेश आहे. भारताचे हे सर्व मुष्टीयोद्धे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते आहेत. अलिकडेच झालेल्या युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या या मुष्टीयोद्धांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. गेल्या जुलैमध्ये झालेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 43 पदकांसह दुसरे स्थान मिळविले होते. चालु वर्षाच्या प्रारंभीच झालेल्या सहाव्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या कनिष्ठ मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेवून बहरीनमधील स्पर्धेतील भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बहरीनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे स्पर्धक 14 विविध वजन गटात सहभागी होत आहेत. मुले आणि मुलींच्या विभागातील प्रत्येकी 7 स्पर्धक 17 वर्षांखालील वयोगटातील आहेत. या मुष्टीयोद्धयांसाठी पतियाळा येथे सराव शिबिर आयोजित केले होते.