पदकांचा दुष्काळ संपविण्यासाठी भारतीय तिरंदाज सज्ज
वृत्तसंस्था/पॅरिस
ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताला तब्बल 36 वर्षे पदक मिळवता आलेले नाही. पण शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरंदाज दर्जेदार कामगिरी करुन पदक मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. रविवारी महिलांच्या तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढती होत आहेत.
शुक्रवारपासून तिरंदाजी या क्रीडा प्रकाराला प्रारंभ झाला आहे. भारताचा चौथा मानांकित तिरंजपटू धिरज बोमदेवरा तसेच महिलांच्या विभागातील 11 वे मानांकित अंकिता भक्त यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये बारा वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचे सहा सदस्यांचा तिरंदाजी संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. तिरंदाजी या क्रीडा प्रकारातील मिश्र सांघिक, पुरूष आणि महिलांच्या सांघिक आणि वैयक्तिक अशा पाच गटात भारताचे तिरंदाजपटू सहभागी होत आहेत. भारताच्या पुरूष आणि महिला सांघिक तिरंदाजी संघाला ऑलिम्पिकमधील पहिले ऐतिहासिक पदक मिळविण्यासाठी किमान 2 विजय नोंदविणे जरुरीचे आहे. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताने या क्रीडा प्रकारात उपांत्यपूर्व फेरी पार केलेली नाही. तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरियाचे अधिक वर्चस्व जाणवते. भारताचे तिरंदाजपटू अंकिता भक्त, भजन कौर आणि दिपीका कुमारी या त्रिकुटाकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. 2021 साली पॅरिसमध्ये झालेल्या विश्वचषक स्टेज -3 स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाने उपांत्यफेरीत फ्रान्सचा पराभव करुन सुवर्णपदक हस्तगत केले होते. वैयक्तिक गटात धिरज, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव हे भारताचे प्रतिनिधीत्व करतील.