For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय तिरंदाजांची मोहीम आजपासून,

06:58 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय तिरंदाजांची मोहीम आजपासून
Advertisement

पॅरिस ऑलिम्पिक : पदकापर्यंत झेप घेण्याचे ध्येय, पुरुष संघ, दीपिका, धीरजच्या कामगिरीवर लक्ष,  

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

नवे वर्ष व नवे ऑलिम्पिक असले तरी भारतीय तिरंदाजांसाठी मात्र एकच टार्गेट असेल, पहिले ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे ध्येय. आज गुरुवारपासून पॅरिस ऑलिम्पिकची तिरंदाज या क्रीडा प्रकाराने सुरुवात होत असून भारतीय तिरंदाजांचे लक्ष्य पदकावर असेल.

Advertisement

येथील लेस इनव्हॅलिडेस गार्डन येथे पहिल्या दिवशी पात्रता फेरी घेतल्या जातील. 2012 लंडन ऑलिम्पिकनंतर भारताचा प्रथमच सहा सदस्यांचा पूर्ण संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मानांकनाच्या आधारावर पुरुष व महिला खेळाडूंना पात्रता मिळाली आहे. त्यामुळे तिरंदाजीतील पाचही प्रकारात भारतीय खेळाडू स्पर्धा करताना दिसतील. अनुभवी तरुणदीप राय व दीपिका कुमारी चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले असून युवा सहकाऱ्यांसह ते आघाडीवर राहतील. पात्रता फेरीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविणे हे त्यांचे प्रथम उद्दिष्ट असेल.

पात्रता फेरीत 53 देशांचे एकूण 128 तिरंदाज सहभागी झाले असून पात्रता फेरीत प्रत्येक तिरंदाजाला 72 तीर मारण्याची संधी मिळेल. यातून मुख्य बाद फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना मानांकन मिळेल, ज्यामुळे सोपा ड्रॉ मिळू शकेल. रविवारी महिलांच्या अंतिम फेरी होईल. पात्रता फेरी भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची असेल. कारण यापूर्वी मानांकनात त्यांची नेहमीच घसरण होत आल्याने त्यांना कोरियासारख्या बलाढ्या संघाविरुद्ध खेळण्याची वेळ आली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्व पुरुष तिरंदाज टॉप 30 च्या पुढील क्रमांकावर राहिले होते आणि संघाला नववे मानांकन मिळाले होते. दीपिका कुमारी ही एकमेव महिला तिरंदाज त्यावेळी सहभागी झाली होती आणि तिलाही नववे मानांकन मिळाले होते. त्यावेळी उपांत्यपूर्व फेरीत संघ व दीपिकाला अग्रमानांकित कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

पुरुष संघाकडून अपेक्षा

फॉर्मचा विचार करता, भारताला पुरुष संघाकडून जास्त अपेक्षा आहेत. यावर्षी त्यांनी शांघायमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक जेतेपद मिळविले आहे. अंतिम फेरीत पहिल्यांदाच भारतीयांनी बलाढ्या कोरियाला पराभवाचा धक्का देत हे यश मिळविले होते. तरुणदीप राय व टोकियो ऑलिम्पियन प्रवीण जाधव यांच्या रूपाने भारताकडे अनुभव आहे. मागील महिन्यात अंटाल्या येथे झालेल्या वर्ल्ड कप स्टेज 3 स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिय रौप्यजेता इटलीचा मॉरो नेस्पोलीला पराभवाचा दिल्याने पदार्पणवीर धीरज बोम्मदेवराचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. धीरजकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जात असून त्याने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य मिळविले, मात्र त्यावेळी दुसऱ्या सहकाऱ्यासमवेत त्याने हे यश मिळविले होते. कठीण स्थिती असताना थंड डोक्याने कार्य करणारा धीरज हांगझाऊ आशिया क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक विभागातील अपयशाच्या स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न करेल.

दीपिकाला मात्र स्वत:शीच संघर्ष करून पुनरुज्जीवित व्हावे लागणार आहे. मात्र सर्वांचे लक्ष तिच्यावरच असणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये शांघाय येथे झालेल्या वर्ल्ड कप स्टेज 1 स्पर्धेत तिने जबरदस्त पुनरागमन करीत रौप्य मिळविले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरियाची अॅन सॅन ही तिची ‘शत्रू’ ठरली होती आणि अॅन सॅननेच त्यावेळी सुवर्ण जिंकले होते. यावेळी अॅन नसली तरी अन्य एक कोरियन लिम सि ह्योऑन तिच्या जागी खेळेल आणि ह्योऑनने यावर्षी तिला दोनदा हरविले आहे. त्यात शांघाय वर्ल्ड कप स्टेजच्या अंतिम फेरीचाही समावेश आहे.

भारतीय तिरंदाजांना आजवर उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा एकदाही पार करता आलेला नाही. आजवरच्या ऑलिम्पिकमध्ये हीच स्थिती झाली आहे. 2000 सिडनी ऑलिम्पिमध्ये मात्र भारतीय तिरंदाज पात्र ठरू शकले नव्हते. ही परंपरा भारतीय तिरंदाजांना आता खंडित करावी लागणार आहे. एकत्रित परफॉर्मन्सचा विचार करता भारताने गेल्या वेळच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. पुरुष, मिश्र संघाने आणि वैयक्तिक विभागात दीपिकाने चांगली कामगिरी केली. पण उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिक सायकलमध्ये पुरुष व महिलांना टॉप मानांकन मिळाल्याने भारताला सांघिक कोटा मिळाला. पुरुष सांघिक अंतिम फेरी सोमवारी तर मिश्र सांघिक अंतिम फेरी पुढील शुक्रवारी आणि वैयक्तिक एलिमिनेश फेरी मंगळवारपासून सुरू होईल.

Advertisement
Tags :

.