भारतीय-अमेरिकन अधिकाऱ्याला अटक
चिनी अधिकाऱ्यांशी गुप्त भेट घेतल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ सल्लागारपदी कार्यरत असलेल्या अॅशले टेलिस या भारतीय-अमेरिकन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे बाळगल्याचा आणि चिनी अधिकाऱ्यांना गुप्तपणे भेटल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता व्हर्जिनिया न्यायालयात खटला चालेल. हा खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे.
64 वर्षीय टेलिस यांच्या व्हर्जिनिया येथील घरातून एफबीआयने 1,000 हून अधिक पानांची गुप्त कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात जर ते दोषी आढळले तर 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 2,50,000 डॉलर्स (अंदाजे 2 कोटी रुपये) दंड होऊ शकतो. न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात टेलिस यांना 15 सप्टेंबर चिनी अधिकाऱ्यांकडून भेट म्हणून एक लाल बॅग देखील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
टेलिस यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये परराष्ट्र विभाग आणि संरक्षण विभागाकडून गुप्त कागदपत्रे काढली. या कागदपत्रांमध्ये हवाई दल नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्तामध्घल नवीन तंत्रज्ञान आणि लष्करी विमानांबद्दलची माहिती समाविष्ट होती. एफबीआयने 12 ऑक्टोबर रोजी टेलिस यांच्या व्हर्जिनिया येथील घराची झडती घेतल्यानंतर तेथे असंख्य गुप्त कागदपत्रे आढळली. टेलिस आपल्या कुटुंबासह रोमला जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली.