भारतवंशीय काश पटेल ‘एफबीआय’चे संचालक
ट्रम्प यांच्या नेतृत्त्वात मिळणार जबाबदारी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) या तपास संस्थेच्या पुढील संचालक पदासाठी भारतीय वंशाच्या काश पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टमध्ये यासंबंधीची घोषणा केली. काश पटेल यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयात चीफ ऑफ स्टाफ, नॅशनल इंटेलिजन्समध्ये डेप्युटी डायरेक्टर आणि नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये दहशतवादविरोधी कार्यक्रमांचे वरिष्ठ संचालक म्हणून काम केले आहे. तसेच 2022 फिफा विश्वचषकादरम्यान कतारसाठी सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केले होते.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी काश पटेल यांच्या भूतकाळातील कामाचेही कौतुक केले आहे. यापूर्वी काश पटेल यांनी उत्तमपणे आपले कौशल्य दाखवले असून आता ते एफबीआयचे पुढील संचालक म्हणून काम करतील याचा मला अभिमान आहे, असे ट्रम्प म्हणाले. याप्रसंगी ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख ‘अमेरिका फर्स्ट’ फायटर असा केला आहे.
काश पटेल यांनी आपली कारकीर्द भ्रष्टाचार उघड करण्यात, न्याय आणि अमेरिकन लोकांचे रक्षण करण्यात घालवली. अमेरिकेतील वाढता गुन्हेगारी दर, गुन्हेगारी टोळ्या आणि सीमेवर होत असलेल्या मानवी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी काश पटेल यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले.
मूळचे गुजराती कुटुंबातील
काश पटेल हे भारतीय स्थलांतरितांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला असून आई-वडील 1970 च्या दशकात युगांडाचे शासक इदी अमीन यांच्या देश सोडण्याच्या आदेशाच्या भीतीने कॅनडामार्गे अमेरिकेत पळून गेले. पटेल यांच्या वडिलांना 1988 मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांना विमान कंपनीत नोकरी मिळाली. 2004 मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केल्यानंतर पटेल यांना मोठ्या लॉ फर्ममध्ये नोकरी न मिळाल्याने त्यांनी सरकारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काश पटेल 2013 मध्ये वॉशिंग्टनमधील न्याय विभागात रुजू झाले. तीन वर्षांनंतर, 2016 मध्ये पटेल यांना गुप्तचर प्रकरणांशी संबंधित स्थायी समितीमध्ये कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले. 2019 मध्ये ट्रम्प प्रशासनात सामील झाल्यानंतर काश पटेल यांना पदोन्नती मिळत गेली. ते ट्रम्प प्रशासनात फक्त 1 वर्ष 8 महिने राहिले, पण सर्वांच्या नजरेत आले. ट्रम्प यांना मुलांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी काश पटेल यांनी ‘द प्लॉट अगेन्स्ट द किंग’ हे पुस्तकही लिहिले आहे.