भारतीय वायुदल प्रमुख ग्रीसच्या दौऱ्यावर
संरक्षण भागीदारीला नवी गती मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ग्रीसमधील संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग अधिकृत भेटीवर ग्रीसमध्ये पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान ग्रीक हवाई दलाने त्यांचे भव्य स्वागत करत गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील चालू लष्करी सहकार्याला एक नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या भेटीदरम्यान, एअर चीफ मार्शल सिंग ग्रीसच्या लढाऊ तुकड्यांसह डेक्लिया हवाई तळावर असलेल्या हेलेनिक हवाई दल अकादमीला भेट देतील. याप्रसंगी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये परस्पर प्रशिक्षण, तांत्रिक सहकार्य आणि संयुक्त लष्करी योजनांवर सविस्तर चर्चा होईल.
एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग ग्रीसमध्ये पोहोचल्यानंतर तेथे ग्रीसच्या हवाई दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल दिमोस्थेनिस ग्रिगोरियाडिस यांनी पापागु लष्करी तळावर असलेल्या हेलेनिक हवाई दल जनरल स्टाफ येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. येथे त्यांना ग्रीसच्या हवाई दलाची रचना, ध्येय आणि ऑपरेशनल क्रियाकलापांची माहिती देण्यात आली. भारतीय वायुदलाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या दौऱ्यासंबंधी माहिती शेअर केली. या भेटीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करणे आहे. दोन्ही देशांच्या हवाई दलांनी यापूर्वी ‘इनियोखोस-23’, ‘इनियोखोस-25’ आणि ‘तरंग शक्ती-24‘ सारख्या संयुक्त लष्करी सरावांमध्ये भाग घेतला आहे.