भारत युवा संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय
रोमांचक सामन्यात 2 गड्यांनी मात, नाबाद अर्धशतक नोंदवणारा निखिल कुमार सामनावीर
वृत्तसंस्था/ चेन्नई
दडपणाखाली अतिशय संयमी नाबाद अर्धशतक नोंदवत भारताच्या निखिल कुमारने येथे झालेल्या यू-19 अनधिकृत पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 2 गड्यांनी पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात 20 व दुसऱ्या डावात नाबाद 55 धावा करणाऱ्या निखिल कुमारला सामनावीराचा बहुमान मिळाला.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या डावखुऱ्या निखिल कुमारने 71 चेंडूत नाबाद 55 धावा जमवित दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताला विजय मिळवून दिला. त्याआधी लेगस्पिनर मोहमद इनानने शानदार गोलंदाजी करीत 79 धावांत 6 बळी घेतल्याने ऑस्ट्रेलियन युवा संघाचा दुसरा डाव 214 धावांत आटोपला. आदल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 110 धावा जमविल्या होत्या. 212 धावांचे विजयाचे उद्दिष्ट गाठताना भारताची मात्र दमछाक झाली. पहिल्या डावात 62 चेंडूत 104 धावांची विक्रमी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी दुसऱ्याच षटकात एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू ऑफस्पिनर थॉमस ब्राऊनकडे सोपविला. त्यांची ही चाल बरीच यशस्वी ठरली. त्याने सूर्यवंशीला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. तो लवकर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला होता. नंतर एडन ओकॉनरने विहान मल्होत्राला 11 धावांवर बाद केल्यानंतर भारताची स्थिती 2 बाद 25 अशी झाली. नित्या पंड्या (86 चेंडूत 51) व केपी कार्तिकेय (52 चेंडूत 32) यांनी 71 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरत संघाला विजयासमीप आणले.
मात्र नित्या व कार्तिकेय दोघांनाही लेगस्पिनर विश्वा रामकुमारने बाद केल्याने भारताची स्थिती 4 बाद 113 अशी झाल्याने भारतीय गोटात चिंता पसरली. सोहम पटवर्धनच्या रूपात पाचवा गडीही लगेचच बाद झाल्याने त्यात आणखी भर पडली. यानंतर मात्र निखिल कुमारने सूत्रे स्वीकारत यष्टिरक्षक अभिज्ञान कुंडूच्या (52 चेंडूत 23) साथीने संघाला 150 धावांची मजल मारून दिली. दोघे संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच ओकॉनरने कुंडूला बाद केले आणि रामकुमारने मोहमद इनानला बाद केल्यावर भारताची स्थिती 7 बाद 167 अशी झाली. निखिल भक्कमपणे खेळत होता. पण त्याला साथीची गरज होती, ती समर्थ नागराजकडून (34 चेंडूत 19) मिळाली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी 47 धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. समर्थ बाद झाला तेव्हा विजय भारताच्या आवाक्यात आला होता. या सामन्यात युवा ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 293 धावा जमविल्यानंतर भारताने सूर्यवंशीच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 296 धावा जमवित केवळ 3 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. मोहमद इनान व सोहम पटवर्धन यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 214 धावांत आटोपल्याने भारताला 212 धावांचे विजयाचे टार्गेट मिळाले होते. भारताने 8 बाद 214 धावा जमवित विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया युवा संघ प.डाव 293, भारत युवा संघ प.डाव 296, ऑस्ट्रेलिया युवा संघ दु.डाव 214 (रिले किंगसेल 48, ऑलिव्हर पीके 32, ओकॉनर 35, मोहमद इनान 6-79, सोहम पटवर्धन 3-27), भारत युवा संघ दु.डाव 61.1 षटकांत 8 बाद 214 (नित्या पंड्या 51, कार्तिकेय 35, निखिल कुमार नाबाद 55, कुंडू 23, ओकॉनर 4-27, विश्वा रामकुमार 3-75).