भारत युवा संघाचा ऑस्ट्रेलिया संघावर डावाने विजय
सामनावीर अनमोलजीत व मोहम्मद इनान यांचा भेदक फिरकी मारा, मालिकेत 2-0 फरकाने यश
वृत्तसंस्था/ चेन्नई
पदार्पणवीर ऑफस्पिनर अनमोलजीत सिंग व लेगस्पिनर मोहम्मद इनान या दोघांनी मिळवून 20 पैकी 16 बळी टिपत येथे झालेल्या दुसऱ्या यू-19 कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियन युवा संघाचा एक डाव 120 धावांनी दणदणीत पराभव केला. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका भारताने 2-0 अशी एकतर्फी जिंकली. सामन्यात 9 बळी टिपणाऱ्या अनमोलजीत सिंगला सामनावीराचा बहुमान मिळाला.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया युवा संघाने 17 बळी गमविले. 3 बाद 142 या धावसंख्येवरून त्यांनी दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती आणि त्यांचा पहिला डाव 277 धावांत आटोपला. फॉलोऑन मिळाल्यानंतर त्यांचा दुसरा केवळ 95 धावांत गडगडला. भारताने पहिल्या डावात 492 धावांचा डोंगर उभा केला होता. पहिल्या डावात कर्णधार ऑलिव्हर पीकेने 143 चेंडूत सर्वाधिक 117 धावा जमविल्या. याशिवाय यष्टिरक्षक अॅलेक्स ली यंगने 66 धावा काढल्या. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 166 धावांची भागीदारी केली. ली यंग बाद झाल्यानंतर शेवटचे सहा फलंदाज केवळ 59 धावांची भर घालून बाद झाले. केरळच्या इनानने 60 धावांत 4 बळी मिळविले. इनानने एकदा दुबईत सकलेन मुश्ताकच्या कार्यशाळेत दाखल झाला होता. तो व लुधियानाचा अनमोलजीत (72 धावांत 4 बळी) हे ऑस्ट्रेलियन युवा संघाचे कर्दनकाळ ठरले.
चार दिवसांच्या सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 150 किंवा त्याहून जास्त धावांनी पिछाडीवर पडला तर त्याला फॉलोऑन दिला जातो. पण भारत युवा संघाला 115 धावांची पहिल्या डावात आघाडी मिळाली होती. फॉलोऑननंतर अनमोलजीतने 13.3 षटकांत 32 धावांत 5 बळी घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 31.3 षटकांत केवळ 95 धावांत गुंडाळला. त्यांच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही, त्यापैकी चारजण शून्यावर बाद झाले. अनमोलने सामन्यात 104 धावांन 9 बळी टिपले तर इनानने 97 धावांत 7 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : भारत युवा संघ प.डाव 492 (हरवंश पांगलिया 117, केपी कार्तिकेय 71, नित्या पंड्या 94, सोहम पटवर्धन 63, निखिल कुमार 61), ऑस्ट्रेलिया युवा संघ प.डाव सर्व बाद 277 (ऑलिव्हर पीके 117, अॅलेक्स ली यंग 66, मोहम्मद इनान 4-60, अनमोलजीत सिंग 4-72), फॉलोऑननंतर दु.डाव 31.3 षटकांत सर्व बाद 95 (सायमन बज 26, स्टीव्हन होगन 29, हॅरी होएक्स्ट्रा नाबाद-20, अनमोलजीत 5-32, इनान 3-37, चेतन शर्मा 1-12.