भारत युवा संघाकडून ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश
शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया 167 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय युवा क्रिकेट संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका एकतर्फी म्हणजेच 3-0 अशी जिंकत ऑस्ट्रेलिया युवा संघाचा व्हाईटवॉश केला. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 167 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय युवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 280 धावा जमविल्या. त्यानंतर भारतीय युवा संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया युवा संघाचा डाव 28.3 षटकात 113 धावांत आटोपला.
भारतीय युवा संघाच्या डावात वेदांत त्रिवेदीने 92 चेंडूत 8 चौकारांसह 86 तर राहुल कुमारने 84 चेंडूत 6 चौकारांसह 62, विहान मल्होत्राने 52 चेंडूत 6 चौकारांसह 40, पांगलियाने 19 चेंडूत 3 चौकारांस 23 तर खिलान पटेलने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या. सलामीच्या वैभव सूर्यवंशी 20 चेंडूत 2 षटकारासह 16 धावांवर बाद झाला. मल्होत्रा आणि त्रिवेदी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली तर मल्होत्रा बाद झाल्यानंतर त्रिवेदी आणि राहुल कुमार यांनी चौथ्या गड्यासाठी 99 धावांची भर घातली. भारताच्या डावात 3 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलिया युवा संघातर्फे बार्टन आणि बेरॉन यांनी प्रत्येकी 3 तर लेचमंड, गॉर्डन, मॅलेझेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलिया युवा संघाच्या डावामध्ये केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सलामीच्या टर्नरने 59 चेंडूत 3 चौकारांसह 32, कर्णधार मालाझेकने 10 चेंडूत 3 चौकारांसह 15 आणि होगेनने 50 चेंडूत 1 चौकारासह 28 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया संघाच्या डावामध्ये 11 चौकार नोंदविले गेले. भारतीय युवा संघातर्फे खिलन पटेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 26 धावांत 4 गडी बाद केले. उद्धव मोहनने 26 धावांत 3 तर कौशिक चौहानने 18 धावांत 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक: भारत युवा संघ 50 षटकात 9 बाद 280 (त्रिवेदी 86, राहुलकुमार 62, मल्होत्रा 40, पांगलिया 23, पटेल नाबाद 20, अवांतर 19, बार्टन आणि बेरॉन प्रत्येकी 3 बळी), ऑस्ट्रेलिया युवा संघ 28.3 षटकात सर्वबाद 113 (टर्नर 32, मॅलेझेक 15, होगेन 28, खिलन पटेल 4-26, मोहन 3-26, चौहान 2-18)