कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला दोन सांघिक सुवर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेरूमध्ये सुरू झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पटकावत मोहिमेची सुरुवात केली. 10 मी. एअर पिस्तूल सांघिक नेमबाजीत दोन्ही संघांनी ही पदके पटकावली. वैयक्तिक गटात मात्र भारताचे संभाव्य सुवर्णपदक हुकले. अंतिम फेरीसाठी उशिरा पोहोचल्यामुळे भारतीय नेमबाजाचे दोन गुण कमी केल्यामुळे त्याला हा फटका बसला.कनिष्ठ पुरुषांच्या गटात उमेश चौधरी, प्रद्युम्न सिंग, मुकेश नेल्लावली यांनी सांघिक प्रकारात एकूण 1726 गुण मिळवित पहिले स्थान मिळविले. त्यांच्यापेक्षा दहा गुण कमी घेत रोमानियाच्या संघाने रौप्य व इटलीने 1707 गुण घेत कांस्यपदक मिळविले. यापैकी चौधरीला मात्र संभाव्य वैयक्तिक सुवर्णपदकाला मुकावे लागले. अंतिम लढतीसाठी तो उशिराने पोहोचल्याने त्याला दोन गुणांचा दंड करण्यात आला. चौधरी व प्रद्युम्न सिंग यांनी त्याआधी पात्रता फेरीत अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळवित वैयक्तिक विभागात अंतिम फेरी गाठली होती. चौधरीने 580 तर सिंगने 578 गुण मिळविले होते. मात्र त्यांना वैयक्तिक विभागात पदक मिळविता आले नाही.
महिलांचा सांघिक विभागात कनिष्का डागर, लक्षिता व अंजली चौधरी यांनी सांघिक विभागात एकूण 1708 गुण घेत सुवर्ण मिळविले. अझरबैजानच्या संघाला त्यांनी केवळ एका गुणाने मागे टाकले. युक्रेन संघाने 1704 गुण घेत कांस्यपदक मिळविले. पात्रता फेरीत डागरने 573 गुण घेत तिसरे स्थान घेत अंतिम फेरी गाठली होती. कनिष्कानेही तितकेच गुण मिळविले. पण तिचे 10 गुणांचे फटके कमी असल्याने तिला पाचवे स्थान मिळाले. वैयक्तिक विभागात कनिष्काने 217.6 गुण घेत कांस्यपदक मिळविले तर डागरला आठवे स्थान मिळाले. चिनी तैपेईच्या चेन यु चुनने वैयक्तिक सुवर्ण, स्लोव्हाकियाच्या मंजा स्लॅकने रौप्यपदक मिळविले.