भारत महिला कबड्डी संघाकडे विश्वचषक
वृत्तसंस्था / ढाका
भारताच्या महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा विश्व कबड्डी चषकावर आपले नाव निर्विवादपणे कोरले आहे. येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने चीन तैपेईचा 35-28 अशा गुणांनी पराभव केला.
भारतीय महिला कबड्डी संघाचा दर्जा निश्चितच जागतिक स्तरावर सुधारल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया भारतीय पुरूष कबड्डी संघाचा माजी कर्णधार अजय ठाकुरने व्यक्त केली आहे. ढाक्यामध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने एकही सामना न गमविताना आपली विजय परंपरा कायम राखत सलग दुसऱ्यांदा विश्व कबड्डी चषक जिंकला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत भारतीय महिला कबड्डी संघाचा दर्जा सुधारत असल्याचे दिसून येते. या वर्षी महिलांची विश्व चषक कबड्डी स्पर्धा भरविण्याची संधी बांगलादेशला मिळाली होती. बांगलादेशमधील या स्पर्धेमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने आपल्या प्राथमिक गटातील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्यानंतर झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्या इराणचा 33-21 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेमध्ये चीन तैपेईच्या महिला कबड्डी संघाने भारताप्रमाणेच प्राथमिक गटातील आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीत चीन तैपेईने यजमान बांगलादेशचा 25-18 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तसेच हरियाणा स्टिलर्सचे प्रमुख प्रशिक्षक मनप्रित सिंग यांनी विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाचे खास अभिनंदन केले आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत 11 देशांच्या संघांनी आपला सहभाग दर्शविला होता. आता जागतिक स्तरावर महिलांच्या कबड्डी या क्रीडा प्रकाराला चांगलेच प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून येते.