विश्व किटलबेल लिफ्टिंग स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदके
वृत्तसंस्था / गुरुग्राम (हरियाणा)
ग्रीसमधील कोर्फु येथे 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय युनियन किटलबेल लिफ्टिंग फेडरेशनच्या विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. भारतीय संघातील पायल कनोडीयाने चमकदार कामगिरी करताना ही सुवर्ण पदके मिळविली.
ग्रीसमध्ये झालेल्या या स्पर्धेत 30 देशांचे अव्वल स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. भारताची पायल कनोडीयाने 68 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 16 किलो वजन उचलत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पायल कनोडीयाने या स्पर्धेत 68 किलो वजन गटात डबल आर्म लाँग सायकल प्रकारात 16 16 किलो वजन उचलत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. 2021 साली हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युनियन किटलबेल लिफ्टिंग फेडरेशनच्या किटलबेल लिफ्टिंग विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत पायल कनोडीयाने रौप्य पदक मिळविले होते. सदर स्पर्धा प्रत्येक दोन वर्षांनी घेतली जाते.